गुवाहाटी : ‘माझ्यासोबत ४० आमदार असून, अजून आणखी १० आमदार येणार आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व आम्ही पुढे नेऊ,असे गुवाहाटी विमानतळावर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी सांगितले. दरम्यान शिंदे हे मुंबईला एक विशेष चार्टर विमानाने उड्डाण करू शकतात, राज्यपालांना भेटू शकतात आणि भाजपला त्यांच्या गटाचा पाठिंबा देऊ शकतात.

एकनाथ शिंदे यांचा गट आता गुवाहाटी येथे अधिक सक्रिय झाला असून या आमदारांपैकी अनेकांनी माध्यमांशी बोलताना जय महाराष्ट्र असं म्हटलंय. तर एकनाथ शिंदे विशेष विमानानं मुंबईत येणार असल्याची माहिती आहे. राज्यपालांची शिंदे भेट घेणार आहेत. यामुळे शिंदे गट ठाकरे सरकारला धक्क्यांवर धक्के देत आहे. एकनाथ शिंदे दुपारनंतर मुंबईत येणार असल्याची माहिती आहे. यावेळी शिंदे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना भेटणार आहेत. यावेळी माझ्यासोबत मोठा गट असल्याची माहिती ते राज्यपालांना देणार आहेत.
दोन तृतीअंश आमदारांपेक्षा जास्त संख्याबळ हे एकनाथ शिंदेसोबत असणं गरजेचं होतं. ३७ हा आकडा एकनाथ शिंदे यांना गाठायचा होता. आता त्यांनी स्वतःच आपल्याकडे ४० आमदार असल्याचं म्हटलंय. त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा हादरा बसला आहे. सत्तास्थापनेचा भाजपसोबत दावा एकनाथ शिंदे करतील, अशी शक्यता आहे. त्यासाठी ते मुंबईमध्ये दुपारी येतील. राज्यपालांची भेट घेतली, असंही सांगितलं जातं आहे.
खरी शिवसेना ही आपल्यासोबत असल्याचे त्यांनी सांगितल्याने शिवसेनेसोबतच्या सर्व वाटाघाटी फोल ठरल्याचंही आता स्पष्ट झालंय. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील फोनवरील संवादातून तोडगा निघालेला नसून आता परिस्थिती शिवसेनेच्या हाताबाहेर गेली आहे.
शिवसेना सोडणार नाही, असं एकनाथ शिंदे पुन्हा पुन्हा सांगत आहेत. म्हणजेच ते शिवसेनेतून बाहेर पडणार नाहीतच, असंही स्पष्ट झालंय. पहिल्यांदा ट्वीटमधून, त्यानंतर मंगळवारी रात्री सूरत इथे माध्यमांशी बोलताना, आणि त्यानंतर आज गुवाहाटी विमानतळावर बोलताना एकनाथ शिंदे यांनी केलेला बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख केला आहे.
