मुंबई: बंडाचा झेंडा हाती घेतलेले शिवसेना नेते एकनाथ शिंदे आता माघार घेण्याची शक्यता कमी आहे. माघारीचे दोर कापले गेल्याने आता ते भाजपसोबत सत्ता स्थापन करणार असल्याचं वृत्त आहे. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असणार आहेत तर त्यांच्या नेतृत्वात एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री असतील.

उत्तर प्रदेशमध्ये जो सत्तेचा फॉर्म्युला होता, तोच फॉर्म्युला महाराष्ट्रात लागू केला जाणार असून, राज्यातही दोन उपमुख्यमंत्री पाहायला मिळणार आहेत. मुख्यमंत्रिपद आणि गृहमंत्रिपद देवेंद्र फडणवीस स्वतःकडे ठेवतील, असं सांगितलं जात आहे. ज्या पद्धतीनं अजित पवार हे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री आहेत, त्याचप्रमाणे महत्त्वाचं अर्थमंत्रिपद एकनाथ शिंदे स्वतःकडे घेतील. अशा पद्धतीची त्यांची बोलणी सुरू आहे.
मंत्रिमंडळाचा विचार केला तर सध्याच्या मंत्रिमंडळामध्ये ३३ कॅबिनेट मंत्री आहेत आणि १० राज्यमंत्री आहेत. ४३ ते ४४ मंत्र्यांचं मंत्रिमंडळ महाराष्ट्रात गेल्या कित्येक वर्षांपासून आहे. महाविकास आघाडीत सर्वात कमी १० कॅबिनेट मंत्री आणि ४ राज्यमंत्री शिवसेनेच्या वाट्याला आलेले आहेत. मात्र या नव्या ४४ मंत्र्यांमध्ये शिवसेनेला किमान १४ कॅबिनेट मंत्री आणि किमान ४ राज्यमंत्रिपद दिले जातील. एकनाथ शिंदेंचा जो गट आहे, तो शिवसेनेचा अधिकृत गट मानायचा की शिवसेना पक्षप्रमुख यांच्याकडे जे काही 12 ते 15 आमदार असतील तो अधिकृत गट मानायचा ही कायदेशीर प्रक्रिया विधानसभा अध्यक्ष आणि राज्यपालांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे ३८ आमदार असल्याचे असं सध्या तरी चित्र आहे. तर मुख्यमंत्र्यांकडे किती आमदार आहेत हे अद्यापही गुलदस्त्यात आहे.
