महाविकास आघाडीची तीन मतं बाद करण्याची भाजपकडून मागणी

मुंबई : प्रचंड चुरस निर्माण झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीची ३ मते बाद करण्याची मागणी भाजपकडून करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, तसेच काँग्रेस नेत्या आणि महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर व शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांची मतं ग्राह्य धरली जाऊ नये अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे.

मतदान करताना गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर आणि सुहास कांदे यांच्या मतावर भाजप आमदार पराग अळवणी यांनी आक्षेप घेत मत ग्राह्य धरु नये अशी मागणी केली आहे.

आव्हाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हातात मतपत्रिका दिली आहे. तर मंत्री यशोमती ठाकूर यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हातात मत पत्रिका दिली आहे. दोन्ही सदस्य मंत्री आहेत. तसेच अशा प्रकारे मतदान करण्याची पद्धत नाही. पक्ष प्रतोदांना आपण कोणाला मतदान करतो हे दाखवण्याची पद्धत आहे. परंतु मत पत्रिका कोणाच्या हातात देण्याची पद्धत नाही. त्यामुळे भाजपचे आमदार पराग अळवणी यांनी आक्षेप घेतला आहे.

आमदार पराग अळवणी यांनी आक्षेप घेतल्यामुळे मतदान थांबवण्यात आले होते. यामध्ये नियमांची पडताळणी करण्यात येत आहे. दरम्यान दोन्ही नेत्यांवर कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल. परंतु भाजपने आक्षेप घेतल्यामुळे मत बाद करण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. जर ही तीन मते बाद झाली तर महाविकास आघाडीचे गणित बदलू शकते. शिवसेनेची जागा आहे ती धोक्यात येऊ शकते. परंतु नियमानुसार मतदान ग्राह्य धरण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मत पत्रिकेवर निवडणूक आय़ोगाचा शिक्का नव्हता. आदित्य ठाकरे यांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला आहे. परंतु त्यांच्या मत पत्रिकेवर आयोगाचा शिक्का नव्हता. त्यामुळे त्यांना दुसरी मत पत्रिका दिल्यानंतर त्यांनी आपले मत दिलं आहे.