कागल (प्रतिनिधी) : देशाच्या सहकारी साखर कारखानदारीमध्ये दीपस्तंभ ठरलेल्या येथील श्री. छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यास वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे यांचा उत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन हा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार पुणे येथे झालेल्या खास समारंभामध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कारखान्याचे व्हाईस चेअरमन अमरसिंह घोरपडे, संचालक संजय नरके, भाऊसाहेब कांबळे, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण आदींनी हा पुरस्कार स्वीकारला.
यावेळी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आरोग्य मंत्री राजेश टोपे, सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम, राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, विजयसिंह मोहिते-पाटील आदी उपस्थित होते.
गळीत हंगाम 2019- 20 या हंगामामध्ये कारखान्याने सभासद शेतकऱ्यांसाठी प्रभावीपणे राबवलेल्या ऊस विकास योजना व त्याची काटेकोरपणे केलेली अमंलबजावणी ऊस विकास योजना राबविण्यात सातत्य व भरीव तरतूद,माती व पाणी परिक्षण योजनेची अंमलबजावणी,हंगाम व जातवार लागण नियोजन व तोडणी कार्यक्रमाची कार्यक्षमरित्या अंमलबजावणी,एक डोळा रोपे लागणीवर भर. कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादन वाढीसाठी एकात्मिक खोडवा व्यवस्थापनावर भर,हुमणी कीड नियंत्रणासाठी जैविक कीड नियंत्रणाचे उपाय, शेतकरी मेळावे व प्रशिक्षण यात सातत्य, सेंद्रिय ऊस शेती प्रयोगाची अंमलबजावणी.याची दखल घेऊन हा पुरस्कार दिला आहे.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे, साखर आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ लिमिटेड मुंबई, वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथे दोन दिवसीय राज्यस्तरीय साखर परिषद आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमात या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
स्व. राजेविक्रमसिंह घाटगे यांनी तीस वर्षापूर्वी कारखाना कार्यक्षेत्रात ऊसाचे उत्पादन वाढावे पर्यायाने सभासदांचे उत्पादन वाढावे म्हणून कारखान्यांमध्ये स्वतंत्र ऊस विकास विभाग स्थापन केला . या माध्यमातून कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद शेतकऱ्यांसाठी विविध ऊस विकास योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.त्यासाठी भरीव अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे. त्याचेच हे फलित आहे.
याबाबत प्रतिक्रिया देताना शाहू साखर कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे म्हणाल्या, कारखान्याचे संस्थापक स्व.राजेविक्रमसिंह घाटगे यांनी बदलत्या परिस्थितीत कारखाना सक्षमपणे कसा चालवावा ही मार्गदर्शक तत्त्वे घालून दिली आहेत. त्याप्रमाणेच शाहूच्या व्यवस्थापनाची व प्रशासनाची वाटचाल सुरू आहे. त्याचेच हे यश आहे .साखर कारखानदारीत सर्वच आघाड्यांवर आदर्श जपण्यात सभासद ऊस उत्पादक कामगार व हितचिंतक यांचा मोलाचा वाटा आहे.
समरजितसिंह घाटगे यांच्या नेतृत्वाखाली शाहूची पुरस्काराची अखंडीत परंपरा…!
कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व. राजेविक्रमसिंहजी घाटगे यांच्या कल्पक व दूरदृष्टी नेतृत्वाखाली त्यांच्या कारकिर्दीमध्ये कारखान्यास पंचावन्न पुरस्कार मिळाले होते. त्यांच्या निधनानंतर शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी कारखान्याची सुत्रे हाती घेतल्यानंतर पुरस्काराची परंपरा अखंडित राहिली आहे. स्व. घाटगे यांनी सभासद शेतकरी हितासाठी घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार घाटगे यांची सभासदाभिमुख कारभारासह पुरस्काराची परंपरा कायम राहिली आहे.