धनंजय महाडिक, पियूष गोयल, अनिल बोंडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

मुंबई :  राज्यसभेसाठी महाराष्ट्रातील भाजपच्या उमेदवारांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यामध्ये केंद्रीय मंत्री पियूष गोयल, माजी मंत्री अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

राज्यसभेच्या ५७ जागांसाठी निवडणूक लागली आहे. येत्या १० जूनला या जागांसाठी निवडणूक होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सहा जागांचा समावेश आहे. संख्याबळानुसार महाराष्ट्रात भाजप दोन, काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीचा एक उमेदवार विजयी होणार आहे. तर सहाव्या जागेसाठी भाजपकडून कोल्हापूरचे धनंजय महाडिक तर शिवसेनेकडून कोल्हापूरचे संजय पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.  

राज्यसभेच्या हमखास निवडून येतील अशा दोन जागांसाठी प्रथम भाजपकडून नावे जाहीर करण्यात आली होती. यामध्ये केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणि अनिल बोंडे यांचा समावेश आहे. या दोघांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर  तिसऱ्या जागेसाठी कोल्हापुरच्या धनंजय महाडिक यांना संधी देण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसनं प्रफुल्ल पटेल यांनी संधी दिली आहे. तर काँग्रेसने या वेळीसुद्धा राज्याबाहेरील उमेदवार दिला असून उत्तर प्रदेशातील प्रख्यात शायर इम्रान प्रतापगढी यांचे नाव निश्चित केले आहे.

धनंजय महाडिक यांचा अर्ज दाखल करताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार प्रकाश आवाडे उपस्थित होते.