कोल्हापूर : चंद्रकांतदादा पाटील कोण? ते शिवाजी महाराजांचे वशंज आहेत का? ते कोण ठरवणारे? त्यांनी आधी २०१९ ला मोडलेल्या शब्दाचा आधी खुलासा करावा. २०१९ ला शब्द कुणी दिला होता आणि कुणी मोडला? यावर आम्ही शक्यतो बोलणं आता टाळतो. आताचा विषय हा संभाजीराजे आणि आमच्यातील आहे. इतरांनी चोमडेपणा करू नये, अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला.
शिवसंपर्क अभियानासाठी संजय राऊत कोल्हापूर दौऱ्यावर असून त्यांनी आज सकाळी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, राज्यसभेच्या सहाव्या जागेचा विषय आमच्यासाठी संपला आहे. संजय पवार यांना आम्ही उमेदवारी दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण केला जात आहे ते चुकीचं आहे. सहावी जागा शिवसेनेची आहे. त्या जागेवर शिवसेनेचा उमेदवार निवडून आणायचा हे आधीच ठरलं होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजीराजेंना असं सांगितलं होतं की, पुरस्कृत हा विषय आहे त्या संदर्भात मला माझ्या सहकाऱ्यांसोबत बोलावं लागेल. मला असं वाटतं हा विषय संपलेला आहे. काल संभाजीराजेंनी आपलं मन मोकळं केलं आहे. आमच्या पक्षाचा निर्णय आम्ही घेतो, उद्धव ठाकरे घेतात. त्यांनी निर्णय घेतला की, राज्यसभेवर दोन शिवसैनिक पाठवायचे आणि त्यानुसार त्यांनी निर्णय घेतला.
ते पुढे म्हणाले, जर 42 मतांचा विषय होता. तुम्हाला जर राजकारणात करिअर करायचं असेल तर तुम्हाला कुठल्या तरी पक्षात जावं लागतं. अगदी महाराणा प्रताप यांचे वंशजही एका पक्षात आहेत. राजकीय विचार घेऊनच पुढे जायचं असतं. व्यक्तिगत काही नसतं. आम्ही संभाजीराजेंना विनंती केली पण त्यांनी स्वीकारली नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे कुणाच्या मालकीचे नाहीयेत. शिवाजी महाराज हे संपूर्ण देशाचे आणि विश्वाचे आहेत हे लक्षात घ्या.