कपिल सिब्बल यांचा काँग्रेसला राम राम; समाजवादी पक्षात प्रवेश

लखनऊ : काँग्रेसचा आक्रमक चेहरा म्हणून ओळखले जाणारे माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. समाजवादी पार्टीच्या पाठिंब्यावर ते राज्यसभेची निवडणूक लढवणार आहेत. त्यासाठी त्यांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला.

कपिल सिब्बल यांनी काँग्रेसला मोठा हादरा दिला आहे. पक्षाचा राजीनामा देऊन त्यांनी समाजवादी पार्टीच्या पाठिंब्यावर राज्यसभेसाठी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत त्यांनी लखनऊमध्ये राज्यसभा निवडणुकीचा आज उमेदवारी अर्ज दाखल केला. १६ मे रोजीच मी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. आम्ही विरोधी पक्षात राहून आघाडी करून मोदी सरकारला विरोध करणार आहोत. २०२४च्या निवडणुकीत मोदी सरकार विरोधी वातावरण तयार करण्याचे काम आम्ही करणार आहोत. मोदी सरकारची चुकीची धोरणे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत

राज्यसभा निवडणुकीसाठी कपिल सिब्बल यांना समाजवादी पार्टीने पाठिंबा दिला आहे. त्यानंतर आणखी दोन उमेदवारांची नावे लवकरच जाहीर केली जातील, असे अखिलेश यादव यांनी यावेळी सांगितले.