मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पार्टनरचे दहशतवादी अजमल कसाबशी संबंध असल्याचा गंभीर आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. तसेच मुंबई २६/११ हल्ल्यात पोलिस अधिकाऱ्यांनी वापरलेले बुलेटप्रूफ जॅकेट बोगस असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

सोमय्या म्हणाले की, शरद पवार यांचे सहकारी नवाब मलिक हे दाऊदचे पार्टनर आहेत तर उद्धव ठाकरे यांचा कसाबशी व्यावासायिक संबधं आहे. नवाब मलिक यांचे संबंध दाऊद गॅंगपर्यंत पोहचू शकतात तर उद्धव ठाकरे यांच्या पार्टनरचे संबंध कसाब पर्यंत आहेत.
तसेच मुंबईवरील २६/११ हल्ल्यावेळी हेमंत करकरेंना देण्यात आलेले बुलेटप्रूफ जॅकेट हे बोगस होते त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. हे जॅकेट बिमल अग्रवाल यांनी पुरवले होते. यशवंत जाधव यांच्यावर ज्यावेळी धाड टाकण्यात आली त्यावेळी बिमल अग्रवाल यांचे नाव पुढे आले होते. शिवसेना नेते, महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या ५३ इमारती आयकर विभागाने बेनामी संपत्ती म्हणून घोषित केल्या आहेत. यशवंत जाधव हे बिमल कुमार, रामगोपाल अग्रवाल यांचे भागीदार आहेत. बिमल अग्रवाल यांचा बुलेटप्रुफ जॅकेट घोटाळा जग प्रसिद्ध आहे. कसाब हत्याकांडच्या वेळेला हा घोटाळा उघडकीस आला होता. तसेच बिमल अग्रवाल यांनी आणि यशवंत जाधव सोबत यांनी पार्टनरशिपमध्ये कंपनी सुरू केली. त्या कंपनीचे नाव समर्थ इरेक्टर्स आणि डेव्हलपर्स असं आहे. समर्थ इरेक्टर्स आणि डेव्हलपर्स या भागीदारी कंपनीने बद्री इन्फ्रा प्रोजेक्ट्स प्रा. लि. कडून ८०० कोटी रुपयांची मलबार हिल येथील एक मालमत्ता विकत घेतल्याचा आरोपही सोमय्यांनी यावेळी केला. समर्थ इरेक्टर्स आणि डेव्हलपर्सचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या सोबतही आर्थिक/व्यवसायिक संबंध आहेत. समर्थ इरेक्टर्स यांनी श्रीधर पाटणकर सोबत बिल्डिंग कन्स्ट्रक्शन/टीडीआर चे व्यवहार केले असल्याचा आरोपही किरीट सोमय्या यांनी केला आहे.
