राजर्षी शाहू महाराजांचे विचार कृतीत आणण्याची गरज : शाहू छत्रपती महाराज

कोल्हापूर : समाजाचे ध्रुवीकरण थांबवून प्रगती साधण्यासाठी राजर्षी शाहू महाराजांचे विचार कृतीत आणण्याची गरज आहे, असे प्रतिपादन करुन याची सुरुवात कोल्हापूरातच होवू शकते, असा विश्वास श्री शाहू महाराज छत्रपती यांनी व्यक्त केला.

कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून जिल्हा प्रशासनाच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्व दि.18 एप्रिल ते 22 मे 2022 दरम्यान आयोजित करण्यात आले. या उपक्रमाचा समारोप केशवराव भोसले नाट्यगृहात झाला, यावेळी ते बोलत होते. यावेळी गृहराज्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, आमदार जयंत आसगावकर, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉ. ज्ञानेश्वर मुळे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. मनोज लोहिया, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, शाहूप्रेमी उपस्थित होते.

कृतज्ञता पर्व अंतर्गत ‘100 सेकंद स्तब्ध उभे राहून लोकराजाला मानवंदना’ या उपक्रमाची राष्ट्रीय स्तरावर नोंद झाल्याबद्दल जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना मान्यवरांच्या हस्ते ‘राष्ट्रीय रेकॉर्ड प्रमाणपत्र’ प्रदान करण्यात आले. राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्व उपक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी कार्यरत ‘कृतज्ञता पर्व संयोजन समिती’ सदस्य, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत तसेच सर्व उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात योगदान देणारे सर्व मान्यवर, संस्था, संघटना, उद्योजक, विविध विभागांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ‘विधवा प्रथा बंदी’ चा निर्णय घेतल्याबद्दल हेरवाड व माणगाव ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य व ग्राम विकास अधिकारी तसेच याविषयी सामाजिक प्रबोधन करणाऱ्या शुभांगी थोरात यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने विविध योजनेतील लाभार्थ्यांना प्रमाणपत्र तसेच तृतीयपंथीयांना मान्यवरांच्या हस्ते ओळखपत्राचे वाटप करण्यात आले.

डॉ. विश्वजित कदम म्हणाले, सामाजिक समतेचा संदेश देणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधी स्थळासाठी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने 8 कोटी रुपयांचा निधी मंजूर उपलब्ध करुन देवू, हा निधी टप्प्याटप्प्याने वितरित करण्यात येईल, अशी ग्वाही सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी दिली. राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्व अंतर्गत विविध उपक्रमांसाठी 5 कोटी रुपयांचा निधी यापूर्वी मंजूर करण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.

डॉ. विश्वजित कदम म्हणाले, विधवा प्रथा बंदीचा क्रांतिकारी निर्णय घेऊन हेरवाड आणि माणगावने राज्यासमोर आदर्श निर्माण केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड आणि माणगाव ग्रामपंचायतीला सामाजिक विकासासाठी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने प्रत्येकी 15 लाखांचा निधी मंजूर करण्यात येत असल्याची घोषणा राज्यमंत्री डॉ.विश्वजित कदम यांनी केली.

छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांवर महाराष्ट्र उभा असून फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांनी राज्य शासनाचे काम सुरु आहे, असे सांगून तृतीयपंथी व्यक्तींच्या विकासासाठी सामाजिक न्याय विभाग प्रयत्नशील असून त्यांच्यासाठी स्वतंत्र बजेटची तरतूद करण्यात येत असल्याचेही राज्यमंत्री डॉ.कदम यांनी सांगितले.

शाहू मिल विकास आराखड्याबाबत लवकरच मुख्यमंत्र्यांसोबत बैठक : पालकमंत्री

पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, शाहू महाराजांचे कार्य भावी पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने ‘कृतज्ञता पर्व’ उपक्रम घेण्यात आला. हजारो हात एकत्र आल्यामुळेच हा उपक्रम यशस्वी झाला. कोल्हापूरकरांनी याला चांगली साथ दिली, म्हणूनच हा उपक्रम जगभर पोहोचला. लोकांसाठी.. लोकाभिमुख कारभार असावा, हेच शाहू महाराजांचे विचार होते. याच विचारांनी कार्यरत असून शाहू महाराज समाधी स्थळाच्या पुढच्या विकासासाठी आठ कोटींचा निधी सामाजिक न्याय विभागाकडून दिला जाणार आहे, त्यामुळे आता स्मारकाचे काम गतीने होईल. केवळ जिल्ह्यापुरता मर्यादित असणारा १०० सेकंद स्तब्ध उभे राहण्याचा उपक्रम सर्वांमुळे जगभर पोहोचला. शाहू महाराजांच्या जीवन कार्यावर आधारित व्याख्याने एकाच वेळी ३५० ठिकाणी घेण्यात आली. याद्वारे राजर्षी शाहू महाराजांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचले. शाहू महाराजांचे विचार जोपासणं.. वाढवणं हे या सर्व उपक्रमाचे उद्दिष्ट होते. शाहू मिलच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहून शाहू मिल विकास आराखडा मंजुरीसाठी लवकरच मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली जाईल, असे आश्वासन पालकमंत्री पाटील यांनी दिले.

शाहू राजाचं अधुरं काम पूर्ण करण्याची जबाबदारी सर्वांची : हसन मुश्रीफ

समाजातील प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा अधिकार, विधवांना समाजामध्ये सन्मानाने वावरण्याचा अधिकार राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी त्याकाळी दिला. प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा अधिकार देण्याचं शाहू राजाचं अधुरं काम पूर्ण करण्याची जबाबदारी आपणा सर्वांची असून ही कामे पूर्ण करण्यासाठी शक्ती मिळो, असे उद्गार ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले.

ग्राम विकास मंत्री मुश्रीफ म्हणाले, शाहू महाराजांच्या विचारांचा पगडा समाजामध्ये घट्ट रुजला आहे. शाहूप्रेमी व शाहू विचारांचा पाईक म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी हा उपक्रम राबवून देशाला व जगाला प्रेरणा देण्याचं काम केले आहे. कला, क्रीडा क्षेत्राबरोबरच गोरगरीब वंचितांसाठी आपला खजिना रिकामा करणारे मोठ्या मनाचे शाहू राजा होते. शेकडो एकर जमीन त्यांनी गोरगरिबांना देऊन गुरं – ढोरं फिरणाऱ्यांना, शेळ्या – मेंढ्या पाळणाऱ्यांनाही प्रोत्साहन दिले. छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांनी स्वतः चा खजिना रयतेसाठी खुला केला.

शाहू राजांचे विचार व कार्य सर्वदूर पोहोचवणे गरजेचे – डॉ. ज्ञानेश्वर मुळे

डॉ. ज्ञानेश्वर मुळे म्हणाले, शाहू महाराजांच्या विचार व कार्य सर्वदूर पोहोचवणे गरजेचे आहे. स्वातंत्र्य, समता आणि न्याय जेव्हा सर्वांना मिळेल तेव्हा खऱ्या अर्थाने शाहू महाराजांचे विचार रुजल्याचे म्हणता येईल, असे सांगून

शाहू महाराजांच्या विचारांचा जागर यापुढेही सुरु ठेवूया- जिल्हाधिकारी

जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांनी विविध क्षेत्रात मोलाचे कार्य केले. या त्यांच्या कार्यामुळे हा जिल्हा संपन्न असण्याबरोबरच कोल्हापूरला वेगळी ओळख निर्माण झाली आहे. भौगोलिक दृष्ट्या संपन्न असण्याबरोबरच येथील नागरिकांचे विचारही संपन्न आहेत. कृतज्ञता पर्व उपक्रम यशस्वी होण्यासाठी कोल्हापूरकरांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. या उपक्रमांतर्गत ६० हुन अधिक कार्यक्रम घेण्यात आले. शाहू महाराजांनी आपल्या अल्प काळातदेखील क्रांतिकारी निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केली. शाहू राजांच्या विचारांनी प्रेरित होऊन हेरवाड गावाने ‘विधवा प्रथा बंदी’चा निर्णय घेऊन क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. शाहू महाराजांच्या विचारांचा अनुयायी म्हणून शाहू महाराजांच्या विचारांचा जागर यापुढेही सुरु ठेवूया, अशी भावनिक साद जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात घातली.