मुंबई : राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरु आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी संभाजीराजेंना पाठींबा जाहीर केला असतानाच शिवसेनेने या जागेवर दावा केला आहे. आता भाजप संभाजीराजेंना पाठिंबा देणार की, आपला तिसरा उमेदवार रिंगणात उतरवणार हे पहावं लागेल. तसेच सेनेने सहाव्या जागेसाठी उमेदवार दिला तर त्यासाठी महाविकास आघाडी समर्थन देणार का? हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार असून त्यामुळे संभाजीराजेंची भूमिका काय राहणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाविकास आघाडीकडे राज्यसभेच्या चार जागा जिंकण्याची मतं असून सहाव्या जागेसाठी कुठल्याही पक्षाकडे विजयी होण्याइतपत मते नाहीत. दरम्यान, या जागेवर आता संभाजीराजे अपक्ष लढणार आहेत अशी घोषणा देखील करण्यात आली आहे. महत्वाचं म्हणजे संभाजीराजेंच्या समर्थकांकडून शरद पवारांनी संभाजीराजेंना पाठींबा दिला असल्याचा दावा करण्यात येत आहे. महाविकास आघाडीकडे सध्या 169 आमदार असून शिवसेना 55, राष्ट्रवादी 54, काँग्रेस 44, इतर पक्ष 8 आणि अपक्ष 8 असं महाविकास आघाडीकडे सध्याच संख्याबळ आहे.
तर भाजपकडे 113 आमदारांचं संख्याबळ आहे. भाजपचे 106 आमदार, रासप 1, जनसुराज्य 1 आणि अपक्ष 5 आमदार अशा एकूण 113 आमदार भाजपकडे आहेत.
संख्याबळानुसार शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा एक उमेदवार सहज राज्यसभेवर निवडून जाऊ शकतो. तर भाजपचे दोन उमेदवार राज्यसभेवर जाऊ शकतात. तिसरी जागा भाजपनं लढवल्यास फोडाफोडी करावी लागू शकते. राज्यसभेच्या एका जागेसाठी 42 मतांची गरज असते. महाविकास आघाडीकडे 169 आमदार आणि भाजपकडे 113 आमदार आहेत.