कराड : भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीत राष्ट्रवादीने भाजपला मदत केल्याचा मुद्दा नाना पटोले यांनी अगदी हायकमांडपर्यंत नेला आहे. अडीच वर्षांपूर्वी सरकार स्थापन करताना आखलेल्या नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. पटोले यांनी याची तक्रार सोनिया गांधी यांच्याकडे केल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, आम्ही या सगळ्याला फार महत्त्व देत नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. ते सोमवारी कराड येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची तक्रार सोनिया गांधी यांच्याकडे केली आहे. याविषयी तुम्हाला काय वाटते, असा प्रश्न अजित पवार यांना सोमवारी पत्रकार परिषदेत विचारण्यात आला. तेव्हा अजित पवार म्हणाले, नाना पटोले यांनी त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना काय सांगावं हा त्यांचा अधिकार आहे. आम्ही याला फार महत्त्व देत नाही. आमच्या पक्षातही काही झालं तर आम्ही शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करतो. आपल्या देशाने २४ पक्ष एकत्र असलेले एनडीए सरकार पाहिले आहे. भांड्याला भांडं हे लागतच असतं. एका कुटुंबात भांड्याला भांडं लागतं तर तीन पक्षांच्या कुटुंबात भांड्याला भांडं लागणारच. तसं होऊ नये, यासाठी तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. सरकार नीट चालवलं पाहिजे, असे अजित पवार यांनी म्हटले.
नाना पटोलेंचा इशारा
अडीच वर्षांपूर्वी ज्या मुद्द्यांवर सरकार बनलं होतं त्याचा उल्लंघन होत आहे.त्यामुळे आमच्या नेत्या सोनिया गांधी यांचा अपमान होत असून आम्ही ते सहन करणार नाही. पक्षश्रेष्ठींकडे राष्ट्रवादीच्या भूमिकेची आम्ही तक्रार केली आहे. पक्षश्रेष्ठी लवकरच त्या तक्रारीबद्दल निर्णय घेतील. येणाऱ्या काही दिवसात त्याचे परिणाम दिसतील. आम्ही सत्तेत राहण्यासाठी सरकारमध्ये नाही, असे नाना पटोले यांनी म्हटले होते.