राज्यसभेला अपक्ष लढणार, स्वराज्य संघटनेची स्थापना करणार : संभाजीराजे यांची घोषणा

पुणे : राज्यसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवण्याची मोठी घोषणा करतानाच स्वराज्य या नव्या संघटनेची स्थापना करणार असल्याची घोषणा माजी खासदार संभाजीराजे यांनी पुण्यात आज जाहीर केली.

पुणे येथे आयोजित केलेल्या पत्रकार बैठकीत संभाजीराजे छत्रपती म्हणाले, राज्यसभेची निवडणूक मी अपक्ष म्हणून लढवणार असून मला भाजप व महाविकास आघाडीने पाठिंबा द्यावा, अशी विनती त्यांनी केली. नवीन पक्ष काढावा म्हणून राज्यभरातून मागणी होत होती. पण समाजाला नवी दिशा देण्यासाठी स्वराज्य या नव्या संघटनेची स्थापना करणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. महाराष्ट्र राज्यातून राज्यसभेच्या ६ जागा आहेत. सहाव्या जागेसाठी दोन्ही पक्षाकडे संख्याबळ कमी आहेत. त्यामुळे भाजप, महाविकास आघाडी व अपक्ष आमदारांनी मला पाठिंबा द्यावा., अशी मागणी त्यांनी केली.

संभाजीराजे म्हणाले, २००७ पासून मी समाजहितासाठी वाहून घेतले आहे. माझ्या सामाजिक कामासाठी मला खासदारकी मिळाली होती. लवकरच मी महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. लोकांना स्वराज्याच्या नावाखाली एकत्र करण्यासाठी दौरा करणार आहे. जनतेला एका छताखाली कसे आणता येईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे संभाजीराजे म्हणाले. जिथे अन्याय होतो तिथे लढा देणार आहे. शिवाजी महाराज आणि शाहू महाजारांचे विचार पोहोचवण्यासाठी ही संघटना स्थापन करणार आहे.