दाऊद इब्राहिमच्या साथीदारांवर एनआयएची मोठी कारवाई; मुंबईत अनेक ठिकाणी छापे

मुंबई : कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमच्या साथीदारांच्या ठिकाण्यांवर छापेमारी करण्यात आली. राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने ही छापेमारी केली आहे. दाऊदच्या टोळीतील गुंडांच्या 20 हून अधिक ठिकाण्यांवर धाड टाकली आहे. ही 20 ठिकाणे दाऊदचे शार्प शूटर, तस्कर, डी-कंपनीचे रिअल इस्टेट मॅनेजर यांच्याशी जोडलेली आहेत.

राष्ट्रीय तपास संस्थेने दहशतवादी दाऊद इब्राहिमचं नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. त्याचे साथीदार आणि पाकिस्तानात बसलेल्या काही हवाला ऑपरेटर्सच्या विरोधात मुंबईत डझनहून अधिक ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. मुंबईतील २० ठिकाणी छापे टाकले आहेत. ही २० ठिकाणे दाऊदचे शार्प शूटर, तस्कर, डी-कंपनीचे रिअल इस्टेट मॅनेजर यांच्याशी जोडलेली आहेत. नागपाडा, गोरेगाव, बोरिवली, सांताक्रूझ, मुंब्रा, भेंडी बाजार या ठिकाणांचा यात समावेश आहे. छाप्याबाबत माहिती देताना एनआयने सांगितले की, दहशतवादी आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या साथीदारांच्या घरांवर अनेक ठिकाणी एनआयएचे छापे सुरू आहेत. अनेक हवाला ऑपरेटर आणि ड्रग्ज पेडलर दाऊदच्या संपर्कात होते आणि तपास संस्थेने फेब्रुवारीपासूनच या संदर्भात कारवाई सुरु केली आहे.

या वर्षी फेब्रुवारीमध्ये एनआयएने दहशतवादी कारवाया, संघटित गुन्हेगारी आणि भारतात अशांतता निर्माण करण्याच्या उद्देशाने डी-कंपनीचे शीर्ष नेतृत्व आणि ऑपरेटर यांच्या सहभागाशी संबंधित गुन्हा दाखल केला होता.

यूएपीए अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. दहशतवादी दाऊद इब्राहिम पाकिस्तानातील कराची येथून अंडरवर्ल्ड नेटवर्क चालवत आहे. त्याच्या सदस्यांनी केलेल्या गुन्हेगारी आणि दहशतवादी कारवायांच्या संपूर्ण प्रकरणावर एनआयएची करडी नजर आहे. १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊदला २००३ मध्ये यूएनने जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. त्याच्यावर २५ दशलक्ष डॉलर्सचे बक्षीसही ठेवण्यात आले आहे. दाऊद इब्राहिमशी संबंधित प्रकरणाचा तपास गृह मंत्रालयाने फेब्रुवारी २०२२ मध्ये एनआयएकडे सोपवला होता. एनआयए ही देशातील सर्वात मोठी दहशतवादी तपास संस्था आहे.यापूर्वी महाराष्ट्राचे मंत्री डॉ. नवाब मलिक यांना अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली.