मुंबई : देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात राजकीय नेत्यांचे फोन टॅपिंग करण्यात आले होते. गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांनी बेकायदेशीरपणे हे फोन टॅपिंग केले होते. हे फोन टॅपिंग केवळ राजकीय द्वेषापोटी करण्यात आले होते. या संपूर्ण प्रकरणामागचा खरा सुत्रधार कोण हे उघड झाले पाहिजे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, फोन टॅपिंगप्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आज माझा जबाब नोंदवला. माझे फोन रेकॉर्डिंग त्यांनी ऐकवले, तो आवाज माझाच होता. शेतकरी आंदोलन विषयक माझी भूमिका या रेकॉर्डिंगमध्ये होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चुकीच्या धोरणाला केलेला विरोध यात होता. कोर्टात चार्जशीटमध्ये याची नोंद येईल. हे फोन टॅपिंग करताना आपले नाव अमजद खान ठेवून ड्रग्जचा व्यवसाय करत असल्याचे कारण दिले होते.
माझ्याकडे एकच फोन नंबर असून राजकीय व सामाजिक जीवनात वावरताना मी कोणतेही चुकीचे काम केलेले नाही त्यामुळे घाबरण्याचे कारणच नाही, ‘कर नाही तर डर कशाला?’. चुकीचे कारण देत दोनदा फोन टॅपिंगची परवानगी घेतली गेली. यामागचा खरा सुत्रधार कोण हे उघड झाले पाहिजे आणि चौकशीतून ते बाहेर येईल असा मला विश्वास आहे, असेही पटोले म्हणाले.