खतांची टंचाई भासू नये यासाठी नियोजन करा : आढावा बैठकीत पालकमंत्र्यांची सूचना

कोल्हापूर : शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी राज्य शासन विविध योजना राबवित असून कृषी विभागाच्या योजनांची माहिती जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करा, असे सांगून खरीप हंगामात बियाणे आणि खतांची टंचाई भासू नये याची दक्षता घ्या, अशा सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी केल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज पालकमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर जिल्ह्याची खरीप हंगामपूर्व आढावा बैठक झाली, यावेळी ते बोलत होते. बैठकीला आमदार राजेश पाटील व आमदार प्रकाश आबीटकर ऑनलाईन सहभागी झाले तर जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यात उसाखालील क्षेत्र अधिक असून ऊस उत्पादकता वाढ चांगल्या प्रकारे होण्यासाठी अधिकाधिक शेतकऱ्यांना प्रशिक्षण द्या. शेतकरी आणि त्यांच्या वारसांना अपघात विम्याची रक्कम लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करा. गरज भासल्यास पोलीस अधीक्षक व संबंधित विभागांशी चर्चा करून विमा प्रकरणे लवकर मंजूर होण्यासाठी प्रयत्न करा. शहरासह ग्रामीण भागाच्या वीज जोडण्यांसाठी उपलब्ध निधी, त्यामधून पूर्ण होऊ शकणाऱ्या कृषी पंपाच्या वीज जोडण्या व विविध प्रकल्पांमुळे लागवडीखाली येणाऱ्या क्षेत्रासाठी आवश्यक विद्युत पुरवठा करण्यासाठी अतिरिक्त लागणाऱ्या निधीचे नियोजन करा असे सांगून श्री. पाटील म्हणाले, विकास सेवा संस्था आणि नाबार्डच्या वतीने कृषी पंपांना सौर उर्जेवर विद्युत पुरवठा करण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर एखाद्या गावामध्ये पथदर्शी प्रकल्प राबवा. या प्रकल्पासाठी नाबार्डने पुढाकार घ्यावा, जेणेकरून शेतकऱ्यांना दिवसभर सौर ऊर्जेचा पुरवठा होऊ शकेल, असेही त्यांनी सांगितले.

ते म्हणाले, सध्या बियाणे मुबलक प्रमाणात असल्यामुळे बियाण्यांची अडचण येणार नाही, तथापि रासायनिक खतांची टंचाई देखील भासू नये, यासाठी आवश्यक ते नियोजन करा. प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये ऊस पिकाचा समावेश करण्यासाठी प्रयत्न करा, अशा सूचना देऊन 2021 मधील पूर परिस्थितीमध्ये शेतीचे झालेले नुकसान, आतापर्यंत देण्यात आलेल्या नुकसान भरपाईचा आढावा त्यांनी यावेळी घेतला.

शेतकऱ्यांना पुरेशी खते, बियाणे उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करा. विशेषता युरिया व डीएपी रासायनिक खतांचा पुरवठा पुरेशा प्रमाणात करा. मिश्र खत उत्पादनासाठीही शेतकऱ्यांना खतांचा पुरेसा पुरवठा करा, अशा सूचना आमदार प्रकाश आबीटकर व आमदार राजेश पाटील यांनी केल्या.