मुंबई : आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी नेहमी चर्चेत राहणारे एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांचा पाय आणखी खोलात गेला आहे. त्यांच्या अडचणीत वाढ होणार झाली असून गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा कोल्हापूर पोलिसांना मिळाला आहे. कोल्हापूर पोलीस वकील गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा घेऊन मुंबईतल्या ऑर्थर रोड जेलमधून कोल्हापूरला रवाना झाले आहेत.
सदावर्ते यांना ताब्यात घेण्यासाठी कोल्हापूर पोलिसांचे पथक काल मुंबईत दाखल झाले होते. मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी कोल्हापूर पोलीस सदावर्तेंवर कारवाई करणार असून मुंबई न्यायालयाने त्यांना पुन्हा १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीचा आदेश दिल्यानंतर सदावर्तेंचा ताबा कोल्हापूर पोलिसांकडे दिला आहे.
मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात कोल्हापूर येथील शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाला विरोध करून मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तसेच मराठा आणि मागासवर्गीय समाज यांच्यात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सदावर्तेंनी केल्याची तक्रार दिलीप पाटील यांनी केली आहे.
दरम्यान, अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात राष्ट्रीय छावाचे प्रदेश उपाध्यक्ष योगेश पवार यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून फौजदार चावडी पोलीस स्टेशन, सोलापूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.