किरीट सोमय्यांना न्यायालयाचा दणका; अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज विशेष न्यायालयने आज फेटाळला. तर त्यांचा मुलगा नील सोमय्या यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी होणार आहे.  आयएनएस विक्रांत बचावसाठी गोळा केलेल्या मदतनिधीत घोटाळा केल्याचा सोमय्या पिता- पुत्रांवर आरोप आहे.

किरीट सोमय्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना टार्गेट केले होते. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांची विक्रांत फाईल्स उघडत, अनेक खळबळजनक आरोप केले होते. आयएनएस विक्रांतसाठी गोळा केलेल्या मदतनिधीत किरीट सोमय्या यांनी घोटाळा केल्याचा आरोप संजय राऊत यांनीनी केला होता.

याप्रकरणी किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्या विरोधात ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर सोमय्या यांनी अटकपूर्व जामीनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. सोमय्या यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज, सोमवारी सुनावणी पार पडली.

सुमारे दोन तास सुनावणी चालली. दोन्ही बाजुचा युक्तीवाद ऐकून कोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. INS विक्रांतच्या नावाने जमा झालेली रक्कम डिपॉझिट झालेली नाही आणि पुरावे पुरेसे नाहीत की ही रक्कम डिपॉझिट झाली, असं कोर्टाच्या लक्षात आलं. त्यामुळे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला. हायकोर्टात जाण्यापर्यंत दिलासा देण्याची मागणी (प्रार्थना) करण्यात आली होती. मात्र तेही कोर्टाने फेटाळले, अशी माहिती सोमय्या यांच्या वकील चड्डा यांनी दिली. याचबरोबर या आदेशाला आम्ही हायकोर्टात आव्हान देणार असल्याचेही वकील चड्डा म्हणाल्या. याशिवाय किरीट सोमय्या यांचा मुलगा निल सोमय्या यांच्या अटकपूर्व अर्जावर उद्या सुनावणी होणार असल्याची माहितीही वकील चड्डा यांनी दिली.