कोल्हापूर : सराफ व्यापाऱ्यांची शिखर संस्था असणाऱ्या कोल्हापूर सराफ व्यापारी संघाची निवडणूक उद्या, रविवारी (ता. 10) होणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कांतिलाल ओसवाल यांनी आज दिली.
रविवारी सकाळी 8 ते दुपारी 3 या वेळेत सराफ संघाच्या महाद्वार रोड येथील कार्यालयात चौथ्या मजल्यावरील हॉलमध्ये मतदान होईल. यासाठी एकूण 684 सभासद पात्र आहेत. दोन वर्षांसाठी पदाधिकारी निवडीसाठी होणाऱ्या निवडणुकीमध्ये एकूण 12 संचालक, एक अध्यक्ष व एक उपाध्यक्षपदासाठी मतदान करावयाचे आहे. विद्यमान अध्यक्ष स्वीकृत संचालक असतील. या वर्षी मारवाडी अध्यक्ष असल्याने अध्यक्षपदासाठी माणिक जैन व राजेश राठोड असे दोन उमेदवार आहेत. उपाध्यक्षपदासाठी विजय हावळ, सुहास जाधव व अनिल पोतदार (हुपरीकर) असे उमेदवार आहेत, तर संचालकांच्या 12 जागांसाठी 18 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
दरम्यान, सोमवारी (ता.11) सकाळी 9 वाजता सराफ संघामध्येच मतमोजणी सुरू होईल. प्रथम संचालक मंडळ, त्यानंतर उपाध्यक्ष व शेवटी अध्यक्षपदाची मतमोजणी होणार असल्याचेही ओसवाल यांनी यावेळी सांगितले. निवडणूक मंडळाचे इतर सदस्य उपस्थित होते.
प्रचार शिगेला
प्रत्येक उमेदवाराने व्यक्तिगत पातळीबरोबर संबंधितांच्या माध्यमातून सभासदांशी संपर्क साधला आहे. आज शनिवार सराफ बाजार बंद असल्याने प्रत्येकाने अगदी सभासदांच्या घरी जाऊन संधी देण्याचे आवाहन केले.
ज्येष्ठांसाठी सुविधा ज्येष्ठ सभासदांना चौथ्या मजल्यावर मतदान करण्यासाठी जाता येणे शक्य होणार नाही. त्यांच्यासाठी तळमजल्यावरच मतदान सुविधा करण्यात आली आहे.