मुंबई : काल आक्रमक एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या सिल्वर ओक या घराबाहेर चप्पल आणि दगडफेक करत आंदोलन केले. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला असून १०४ कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. याचबरोबर पोलिसांनी एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले. जमावाला भडकवणे, कट रचणे या गुन्ह्या अंतर्गत वकील गुणरत्न सदावर्ते यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केली आणि चौकशीनंतर सदावर्ते यांना अटक केली.

मुंबई पोलिसांनी एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक केल्यावर आपल्यावर केलेल्या कारवाईच्या विरोधात गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांनी मला कुठल्याही प्रकारची नोटीस न देता चौकशीसाठी ताब्यात घेतले असून माझ्या पत्नीने गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे माझ्या जीवाला धोका असून माझी हत्याही होऊ शकते, असं सदावर्ते यांनी म्हटले आहे.
दरम्यान, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील शरद पवारांसारख्या जेष्ठ नेत्याच्या घरावर मुंबईत अशा प्रकारे हल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. इंटेलिजन्सचं हे अपयश असल्याचं बोललं जात आहे. या आंदोलनाबाबत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, ही अचानक घडलेली आणि दुर्दैवी घटना आहे. इतक्या जेष्ठ नेत्याच्या घरी अशा प्रकारे हल्ला करणं निश्चितच काळजी करण्याची गोष्ट आहे. याबाबत पोलीस आयुक्त, सहपोलीस आयुक्तांना सूचना दिल्या आहेत. या प्रकरणात जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल.
एसटी कामगारांच्या आडून काही राजकीय शक्ती हिंसा घडविण्याचा काम करत आहे. महिलांना पुढे करून मॉब तयार करण्यात आला आहे, यामुळे पोलिसांना कारवाई करता आली नाही. खरेच आंदोलक होते का? याचा शोध करण्यात येणार आहे असंही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे.