इचलकरंजी (प्रतिनिधी) : जमखंडी ( कर्नाटक) येथून आपल्या मावशीकडे राहण्यास आलेल्या आणि खेळता खेळता हरवलेल्या अल्पवयीन मतिमंद मुलीचा इचलकरंजी पोलिसांनी त्वरित शोध घेऊन तिला तिच्या पालकांकडे सुपूर्द केले. याबाबत पोलिसांनी दाखवलेली तत्परता वाखाणण्याजोगी आहे.
याबाबतीत घडलेली घटना अशी – श्रीमती लक्ष्मी शिवाजी शिकलगार (मूळ रा. शिकलगार गल्ली इंदिरानगर, जमखंडी) या पंधरा दिवसापूर्वी इचलकरंजी येथे राहणा-या आपली बहीण चंद्रिका हणमंत शिकलगार (रा. सुर्योदय नगर गली नं. २, स्टेशन रोड, इचलकरंजी) यांच्या घरी आपल्या आठ वर्षांच्या मतीमंद मुलीसह राहण्यास आल्या होत्या. मात्र, आज दुपारी शिकलगार हया घरामध्ये काम करीत असताना त्यांची ८ वर्षाची मुलगी खेळत असताना हरवली. त्यांनी तिचा आजूबाजूला शोध घेऊनही ती सापडली नाही. त्यामुळे संध्याकाळी चार वाजता राहुल रमेश शिकलगार यांनी शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली.
मुलगी अल्पवयीन आणि मतिमंद असल्याने घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी मुलीचा शोध सुरु केला. घटनेची माहिती मिळताच उप विभागीय पोलीस अधिकारी बी. बी. महामुनी यांनी घटनास्थळी भेट दिली व मुलीचा शोध घेण्याबाबत मार्गदर्शन केले. अधिनस्त पोलीस अधिकारी महिला सपोनि रुपाली पाटील, पोसई मनोज पाटील, तीन्ही बीट मार्शल, डायल ११२ चे अंमलदार व गुन्हे शोध पथकाचे अंमलदार यांनी त्वरेने मुलीचा शोध सुरु केला. मुलीचा फोटो व सीसीटीव्ही फ़ुटेज शहरातील नागरीकांच्या व्हॉटसॲप ग्रुपवरही शेअर केले. ही मुलगी मतिमंद तसेच कन्नडभाषिक असल्याने व मराठी समजत नसल्यामुळे तिला शोधणे एक आव्हान होते. पोलिसांनी जवाहरनगर परिसरात सीसीटीव्ही फुटेज तपासले असता मुलीचा जाण्याचा मार्ग मिळाला. परिसरातील नागरिक, पोलीस व सामाजिक संघटना यांच्या मदतीने शोध सुरु असताना ही मुलगी जवाहरनगरमध्ये सुखरुप मिळाली. तिची विचारपूस करून ती सुखरुप असल्याची खात्री झाल्यावर पोलिसांनी तिला पालकांच्या ताब्यात दिले आहे.