महाविकास आघाडीने विकास नव्हे तर राज्याला भकास केले : महेश जाधव

कोल्हापूर : गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारकडून राज्याचा विकास नव्हे तर भकास झाला, अशी टीका देवस्थान व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव यांनी केली. महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांना तुरूंगात जावे लागते, सरकारवर खंडणी आणि भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. स्थायी समिती अध्यक्षांसह मंत्र्यांपर्यंत तिन्ही पक्षातील अनेकांवर गैर व्यवहाराची टांगती तलवार आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीला जनता कंटाळली आहे, असा दावाही महेश जाधव यांनी केला.

भाजप उमेदवार सत्यजितनाना कदम यांच्या प्रचारार्थ राजारामपूरी मातंग वसाहत इथं झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. कोरोना काळात मोदी सरकारनेच मोफत लस दिली. गोरगरीबांना रेशनवर फुकट अन्नधान्य दिले. महापालिकेतील चतुर्थश्रेणी कर्मचार्‍यांना वेळेवर पगार मिळावा, यासाठी सत्यजितनाना कदम यांनीच प्रयत्न केलेत. या सगळयांचा परिपाक म्हणून आता कोल्हापूर उत्तर मतदार संघातून सत्यजितनाना कदम यांना जनता निवडून देईल, असा विश्‍वासही जाधव यांनी व्यक्त केला. भाजपचे उमेदवार सत्यजीतनाना कदम यांच्या प्रचारासाठी प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील हे कोल्हापुरात तळ ठोकून आहेत. तर भाजप महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनीही मुक्काम ठोकला असून, त्यांनी प्रचाराचा चांगलाच धुरळा उडवून दिला आहे. राजारामपूरी मातंग वसाहत येथे झालेल्या सभेला महिलांची संख्या लक्षणीय होती. महेश जाधव यांनी, गेल्या अडीच वर्षात सत्तेवर असणार्‍या महाविकास आघाडी सरकारच्या कामगिरीचा अक्षरशः पंचनामा केला. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारने केवळ लुटमार चालवली आहे. राज्यातील पुरग्रस्त नागरीक आणि शेतकरी अजुनही मदतीच्या प्रतिक्षेत आहेत. गेले चार महिने सुरू असणार्‍या एस. टी. संपावर अजुनही तोडगा निघालेला नाही. आघाडी सरकारमध्ये भ्रष्टाचाराचा कळस गाठला असून, रोज एक मंत्री जेलमध्ये जात आहे, अशा शब्दात महेश जाधव यांनी हल्ला चढवला.

यावेळी भाजपचे उमेदवार सत्यजीतनाना कदम यांचेही भाषण झाले. त्यांनी गेल्या दहा वर्षात केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजना कोल्हापूर शहरात राबवण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे केला. मात्र पालकमंत्री सतेज पाटील यांनी अनेक योजनांमध्ये खोडा घातला. केंद्राच्या आणि राज्याच्या योजनांना ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी, महापालिका प्रशासनावर राजकीय दबाव आणला, असे नमुद केले. विधानसभेत गेल्यानंतर महिलांसह वंचित, कष्टकरी-गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठी आपण वाहून घेवू, अशी ग्वाही कदम यांनी दिली.

यावेळी आरपीआय आठवले गटाच्या महिला जिल्हाध्यक्षा आणि प्रदेश सचिव रूपा वायदंडे यांचेही भाषण झाले. त्यांनी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे रखडलेले स्मारक, महामंडळातील कोट्यवधी रूपयांचा भ्रष्टाचार यावर भाष्य केले. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, आण्णाभाऊ साठे महामंडळाची पुनर्रचना करून, भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याने, समाजबांधवांना मोठा आधार मिळाल्याचे त्यांनी नमुद केले. सामाजिक कार्यकर्ते बाबा इंदुलकर यांनी, संपूर्ण राज्यात इतिहास घडवणारी ही निवडणूक असून, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या नावाने असणार्‍या चौकातील सभेतून सत्यजीत कदम यांना निवडून देवूया, असे आवाहन केले. यावेळी अमित घोडके, आदिनाथ साठे यांचीही भाषणे झाली. सभेला हिंदुत्ववादी कार्यकर्ते बंडा साळोखे यांच्यासह राज सोनवणे, बापू घोलप, धनश्री जर्दे, शिवानी पाटील, संगीता खाडे, अमर साठे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

🤙 9921334545