कोल्हापूर : भारतीय जनता पक्ष हा देशातील सर्वात मोठा पक्ष असून, विकासात्मक धोरणामुळं भाजपला जनतेचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. शिस्तबध्द पक्ष संघटन असलेल्या भाजपला कोल्हापूर उत्तरमध्ये विजय मिळेल आणि त्यामध्ये तटाकडील तालीम परिसराचा मोठा वाटा असेल, असे प्रतिपादन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव यांनी केले.
कोल्हापूर उत्तर मतदार संघातील भाजप उमेदवार सत्यजितनाना कदम यांच्या प्रचारार्थ, तटाकडील तालीम येथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी कोल्हापुरातील अनेक तालीम-संस्थांना मोठे सहकार्य केले. कोरोना आणि महापूराच्या काळातही भाजपच्या कार्यकर्त्यांनी जनतेला सर्वतोपरी मदत केली. अयोध्येतील राम मंदिराची उभारणी असो किंवा काशी विश्वेश्वर मंदिराचा जीर्णोध्दार असो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील हिंदू बांधवांच्या मनातील स्वप्नपुर्ती केली आहे. भाजप केवळ भावनेवर राजकारण करत नाही, तर विकासाची निश्चित दिशा घेऊन काम करणारा पक्ष आहे. त्यामुळेच शेतकरी, महिला, कामगार, उद्योजक, विद्यार्थी, तरूण वर्ग अशा सर्वांसाठी केंद्र सरकारने अनेक योजना आणल्या. कोल्हापूर उत्तरमधील प्रश्न सोडवण्याची ताकद आणि धमक भाजपमध्ये असून, सत्यजितनाना कदम यांना निवडून देण्यासाठी भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता राबत आहे. त्याला जनतेचाही मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे महेश जाधव यांनी सांगितले.
महाविकास आघाडी सरकारने केवळ भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार यावर लक्ष केंद्रीत केले आहे, अशा शब्दात आमदार सदाभाऊ खोत यांनी टिकास्त्र सोडले. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील भाजप सरकार राज्यात सत्तेवर असताना, शेतकर्यांसह सर्वसामान्य जनतेच्या हिताचे अनेक निर्णय झाले. आता मात्र महाविकास आघाडी सरकारच्या काळात, जनतेला वार्यावर सोडून केवळ भ्रष्टाचार आणि खंडणी उखळण्याचे प्रकार सुरू आहेत. महाविकासआघाडी सरकारमधील मंत्री तुरूंगात जात असून, अनेक आरोपांनी या सरकारची प्रतिमा मलीन झाली आहे. प्रत्येक अपयशाचे खापर केंद्र सरकारवर फोडायचे आणि त्यांच्याकडे बोट दाखवायचे, अशी महाविकास आघाडी सरकारची कार्यपध्दती आहे. त्यामुळे हे सरकारच नको अशी राज्यातील जनतेच्या मनातली भावना आहे, अशी घणाघाती टीका सदाभाऊ खोत यांनी केली.
यावेळी प्रदेश प्रवक्ते धनंजय महाडिक यांचेही भाषण झाले. त्यांनी आपल्या भाषणात कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने पालकमंत्र्यांनी निर्माण केलेल्या दहशतीवर भाष्य केले. यावेळी महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा शौमिका महाडिक, माजी नगरसेवक अजित ठाणेकर यांचीही भाषणे झाली. सभेला दयावान ग्रुपचे अध्यक्ष प्रताप देसाई, राजू जाधव, हिंदवी ग्रुपचे सुदर्शन सावंत, भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक देसाई, विजय जाधव, महेश उरसाल, गायत्री राऊत उपस्थित होत्या.