सरूड : शाहूवाडी तालुक्याच्या उत्तर भागातील शित्तूर वारुण पैकी कदमवाडीत विजेच्या शॉर्टसर्किटने सात घरे जळाली असून आगीत ७ कुटुंबांचा संसार बेचिराख झाला. यात ७ शेळ्या जळून मृत्यूमुखी पडल्या, तर अन्य दोन जनावरे भाजली आहेत. नामदेव कुशाबा कदम हे होरपळून जखमी झाले. ही दुर्घटना बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास घडली.
शित्तूर तर्फ वारुण पैकी कदमवाडी ही वस्ती मुख्य गावापासून दोन किलोमीटर अंतरावर दुर्गम भागात असल्याने जळीत घटनेची माहिती समजण्यास सकाळचा सूर्य उगवला होता. नामदेव कुशाबा कदम यांच्या घराला रात्रीच्या अंधारात अचानक लागलेल्या आगीने रौद्र रूप धारण केले. या घरात सात कुटुंबे रहातात होती. पहाटेची वेळ असल्याने सर्वजण झोपेत होते. मोठे लांबीचे घर आणि घराच्या बाजूस जनावरांचा गोठा आहे.
या भयंकर आगीच्या भक्ष्यस्थानी अवघे घर पडले. जनावरांना वाचवताना माणसे होरपळून निघालीत. शेळ्यांचा कळप असलेल्या गोठ्यावर पेटते छप्परच कोसळले. त्यामुळे शेळ्या होरपळून गतप्राण झाल्या. गाय व बैल भाजल्याने गंभीर जखमी झाले आहे. कुटुंबाचे संसारोपयोगी साहित्य, चीजवस्तू, तर कंगणीतील धान्य या सर्वांचा जळून कोळसा झाला.
परिसरातील लोकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी यथाशक्ती प्रयत्न केले मात्र आधीच वाडीवर पाण्याची कमतरता असल्याने आग नियंत्रणात आणणे कठीण गेले. उभा संसार जळत असताना दुर्घटनाग्रस्त कुटुंबे ही आग विषन्यपणे पाहत उभे होते. सदर च्या आगीत खुद्द नामदेव कुशाबा कदम हे सुद्धा होरपळून जखमी झाले आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रामचंद्र कुशाबा कदम, भरत रामचंद्र कदम, नामदेव कुशाबा कदम, मारुती नामदेव कदम, आनंदा नामदेव कदम, शंकर नामदेव कदम, राजाराम नामदेव कदम या सात कुटुंबीयांची या घरे जळून खाक झाल्यामुळे या सर्वांचा संसार काही क्षणात उघड्यावर पडला आहे.