ठाणे: मराठा समाजाच्या सात मागण्यांसाठी खासदार संभाजी छत्रपती यांनी उपोषण सुरू केलं आहे. उपोषणाला बसलेल्या संभाजी छत्रपती यांची प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे मराठा क्रांती ठोक मोर्चाही आक्रमक झाला आहे.
मराठा क्रांती ठोक मोर्चाने संभाजी छत्रपती यांना पाठिंबा दिला आहे.घटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते संभाजीराजेंना पाठिंबा देण्यासाठी आझाद मैदानात जमले आहेत. संभाजीराजे यांनी उपस्थित केलेल्या मागण्यांवर चर्चा करण्याची किंवा सरकारसोबत बैठक करण्याची गरज नाही.
सरकारने थेट पत्र घेऊनच आझाद मैदानात यावे, असं सांगतानाच आता आमचा संयम संपला आहे. आम्ही शांत बसणार नाही. या तीनचाकी सरकारचा आम्ही निषेध करतो. संध्याकाळपर्यंत या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या बंगल्यात घुसू, असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाने दिला आहे.मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील आणि रमेश खैरे-पाटील यांनी ही आक्रमक भूमिका मांडली आहे.
संभाजी राजे यांनी मांडलेल्या मागण्या तात्काळ पूर्ण झाल्या पाहिजेत. या मागण्यांबाबत त्यांची आधीच सरकार सोबत चर्चा झाली आहे. सरकारने तेव्हा सकारात्मक भूमिकाही घेतली होती. फक्त त्याची अंमलबजावणी करायची बाकी आहे, सरकारने त्यावर त्वरीत निर्णय घ्यावा. आता चर्चेचा प्रश्नच येत नाही, असंही क्रांती मोर्चाने म्हटलं आहे.