कोल्हापूर (प्रतिनिधी): २००९ ला मिरज येथे मोठी दंगल झाली होती. या दंगलीमुळे कोल्हापूर जिल्ह्यात वातावरण निर्मिती झाली.मी नेतृत्व केले म्हणूनच विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेचे सहा आमदार निवडून आले असे प्रत्युत्तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी मा.आ.राजेश क्षीरसागर यांच्या टीकेला केले.कोल्हापूरात संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना भाजपातर्फे धान्याचे किट वाटप करण्यात आले. यानंतर माध्यमांशी ते बोलत होते.
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी, २०१९ साली विधानसभा निवडणुकीत भाजपने विश्वासघात केल्यामुळे आपला पराभव झाला होता, असं सांगत काल पत्रकार बैठकीत भाजपवर निशाना साधला होता.
पुढे बोलताना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, आपण २०१९ ला देखील क्षीरसागरांच्या विजयासाठी प्रामाणिक प्रयत्न केले होते. पण, पराभव झाला की भाजपमुळे असे म्हटले जाते, मग २००९ आणि २०१४ च्या विधानसभेच्या निवडणुकीत जो विजय मिळवला त्यावेळी आम्ही बरोबर नव्हतो का? तो विजय कोणामुळे झाला, असा सवालही चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला.