दु. का. संत हे संशोधन क्षेत्रातील ज्ञानतपस्वी: डॉ. अविनाश सांगोलेकर

कोल्हापूर: दु. का. संत हे संशोधन क्षेत्रातील ज्ञानतपस्वी होते, असे प्रतिपादन डॉ. अविनाश सांगोलेकर यांनी आज केले. शिवाजी विद्यापीठात मराठी अधिविभागातर्फे आयोजित डॉ. दु.का. संत व्याख्यानमालेअंतर्गत ‘डॉ. दु. का. संत: जीवन आणि कार्य’ या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलसचिव डॉ. विलास शिंदे होते.

 

सांगोलेकर म्हणाले, दु. का. संत हे ज्ञानाने भरलेले झाड असून त्यांचे सर्व लेखन मौलिक चिंतनातून आलेले आहे. संत हे व्रतस्थ संशोधक आणि समीक्षक होते. त्यांनी काळाच्या पुढचा विचार करून केलेले लेखन आजही दिशादर्शक आहे. स्त्री मुक्ती संदर्भातील त्यांचे लेखन मौलिक स्वरूपाचे असून त्याला चिंतनाची जोड आहे.

मराठी अधिविभागप्रमुख डॉ. रणधीर शिंदे म्हणाले, दु. का. संत संशोधनातील पहिल्या पिढीचे अग्रदुत आहेत. संशोधन क्षेत्रातील त्याचे कार्य हे मूलभूत स्वरूपाचे असून त्यांच्या सर्व लेखनामधून आस्था, जिव्हाळा आणि शिस्तीचा प्रत्यय येतो. या व्याख्यानासाठी विशेष उपस्थित असणारे दु. का. संत यांचे चिरंजीव उदयप्रकाश संत यांनी संत यांच्या आठवणींना उजाळा दिला.

अध्यक्षीय मनोगतात कुलसचिव डॉ. विलास शिंदे म्हणाले, दु. का. संत यांचे लेखन आजच्या संशोधक विद्यार्थ्यांना मार्गदर्शक आहे. तसेच, काळाच्या पुढचा विचार करून लिहिणारा लेखक दुर्लक्षित राहिला याची खंत आहे. त्यांच्या संशोधनाचा, लेखनाचा आणि विचाराचा वारसा पुढे नेण्यासाठीच ही व्याख्यानमाला आहे.

प्रांजली क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. सुखदेव एकल यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी डॉ. नीता संत, अमृता पाटील, शाल्मली संत, अभिजीत पाटील, डॉ. अनिल उबाळे, प्रा. पी. आर. गावडे यांच्यासह मराठी विभागातील संशोधक, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

 

 

🤙 8080365706