बारामतीच्या शासकीय रुग्णालयासही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचेच नाव-वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची विधानसभेत घोषणा

मुंबई: बारामती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्नित रुग्णालयासही “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर” यांचे नाव देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी निवेदनाद्वारे विधानसभेत जाहीर केला केला. त्याबाबतचा शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे.

बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला दि. 31 मे 2023 रोजी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय’ हे नाव देण्यात आले होते. आता त्याच परंपरेला पुढे नेत रुग्णालयालाही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, बारामती’ असे नामकरण करण्यात आले आहे. या संदर्भातील शासन निर्णय दि. 13 मार्च 2026 रोजी निर्गमित करण्यात आला असून, याबाबतचे अधिकृत निवेदन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत आज केले. या निर्णयामुळे बारामतीतील वैद्यकीय सेवांना ऐतिहासिक आणि सांस्कृतिक अधिष्ठान प्राप्त झाले आहे.

महाराष्ट्राच्या इतिहासात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य अत्यंत प्रेरणादायी मानले जाते. त्यांच्या न्यायप्रिय, लोकाभिमुख आणि धर्मनिरपेक्ष कारभारामुळे त्या आदर्श प्रशासक म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या नावाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे नामकरण केल्याने आरोग्य सेवेबरोबरच सामाजिक मूल्यांचीही जपणूक होणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये अभिमानाची भावना निर्माण झाली असून, बारामतीच्या वैद्यकीय क्षेत्रात हा निर्णय एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. शासनाच्या या पावलामुळे ऐतिहासिक वारशाचा सन्मान राखत आधुनिक आरोग्य सेवेला नवे बळ मिळणार आहे.
*****

🤙 8080365706