कोल्हापूर प्रतिनिधी : जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रम यांच्या जोरावर ग्रामीण भागातील तरुणही मोठी स्वप्ने साकार करू शकतात, याचे प्रेरणादायी उदाहरण भुदरगड तालुक्यातील कोंडोशी या छोट्याशा खेड्यातील तरुणाने घालून दिले आहे. कु. निखिल नयना नारायण बेळणेकर यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) अहमदाबाद येथील स्पेस अॅप्लिकेशन सेंटरमध्ये प्रकल्प सहाय्यक – १ या महत्त्वाच्या पदावर निवड झाली आहे. त्यांच्या या यशामुळे कोंडोशीसह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

निखिल यांचा शैक्षणिक प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण (इयत्ता १ ली ते ७ वी) स्थानिक जिल्हा परिषद शाळेत पूर्ण केले. त्यानंतर इयत्ता ८ वी ते १० वी चे शिक्षण प. बा. पाटील हायस्कूल, मुदाळ येथे घेतले.
पुढील शिक्षणासाठी त्यांनी पुण्याचा मार्ग धरला. राजीव गांधी ज्युनियर कॉलेज आणि स्पेस अकॅडमी, पुणे येथे त्यांनी ११ वी व १२ वी पूर्ण केली. त्यानंतर डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज, तळसंदे येथून बी.टेक. पदवी संपादन केली. पुढे युनिव्हर्सिटी ऑफ अॅग्रिकल्चर अँड सायन्स, बेंगलोर येथून एम.टेक. ही उच्च पदवी मिळवली.
निखिल हे कोंडोशी येथील प्राथमिक शिक्षक नारायण बेळणेकर यांचे सुपुत्र आहेत. ग्रामीण भागातून शिक्षण घेऊन इस्रोसारख्या प्रतिष्ठित संस्थेत निवड होणे हे निश्चितच अभिमानास्पद आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक व अभिनंदन होत असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी त्यांचे यश प्रेरणादायी ठरत आहे.
जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर कोणतेही ध्येय गाठता येते, हे निखिल बेळणेकर यांनी आपल्या यशातून सिद्ध करून दाखवले आहे.
