कोल्हापूर : मंगळवार पेठ, खासबाग येथील कैलासगडची स्वारी मंदिराच्या ६६ वा वर्धापनदिन सोहळानिमित्त रविवार दिनांक २२/२/२०२६ ते सोमवार दिनांक ३/३/२०२६ या कालावधीमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहिती अध्यक्ष व नगरसेवक सत्यजित जाधव आणि उपाध्यक्ष केशव पोवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कैलासगडची स्वारी मंदिराच्या ६६ वा वर्धापनदिनानिमित्त ज्ञानेश्वरी पारायण, प्रवचन, भजन, सांस्कृतिक कार्यक्रम व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवारी दि. २२ रोजी सायंकाळी सहा वाजता इस्कॉन नित्यानंद नगर संकीर्तन भक्तवृंद मंदिरच्या वतीने भगवद गीता पाठ कार्यक्रमाने सुरुवात होणार आहे. सोमवारी दि. २३ पासून व ह.भ.प.रामचंद्र यादव महाराज यांचे कृपाशिर्वादाने श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह, प्रवचन व सांस्कृतिक कार्यक्रमांची सुरुवात होणार आहे. पारायणाची सांगता रविवार दि. १ मार्च रोजी काल्याचे किर्तन व प्रसाद वाटपाने होणार आहे.
सोमवारी ता. २ रोजी रात्री १० वा. शिवालय भजनी मंडळ यांचे भजन व मध्यरात्री १२ वा.रुद्र महाभिषेक व श्रींचे दर्शन आशीर्वाद धार्मिक विधीवत पुरोहितांच्या उपस्थितीत व भक्तांच्या उपस्थितीत होणार आहे. तसेच मंगळवार दि. ३ रोजी सकाळी 11 वाजता सत्यनारायण पूजा व प्रसाद वाटप आणि सायंकाळी ४.३० वा. मर्दानी खेळ व ५.३० वाजता पालखीचे सोहळ्यास सुरुवात होणार आहे. पालखी पूजन जगद्गुरु श्री श्री विद्या नृसिंह भारती शंकराचार्य महाराज (करवीर पीठ) यांच्या हस्ते व शिवसेना उपनेते माजी आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. शिवालय भजनी मंडळ यांचे भजन, धनगरी ढोल, झांजपथकाच्या गजरात पालखी सोहळा असून, पालखी समोर भव्य आतिषबाजी करण्यात येणार आहे. सायंकाळी ७.०० वाजता महापौर रूपाराणी निकम, उपमहापौर अक्षय जरग यांच्या हस्ते व नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर, निलांबरी साळोखे, माधुरी नकाते, जयश्री चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत महाप्रसाद वितरण सोहळा होणार आहे. स्वारींच्या आशिर्वादाने सर्व विश्वस्त व भागातील सर्व महिला व भक्तांच्या उपस्थितीत वर्धापन दिनाचे सर्व कार्यक्रम होणार आहेत.
यावेळी महादेव महाराज यादव, सेक्रेटरी विलास गौड, श्रीमती पद्मावती बबेराव जाधव, वैष्णवी शिवाजी जाधव, मंदिराचे पुजारी विठ्ठलराव जाधव व गणेश भोसले, उदय कारंजकर, दीपक जाधव, मंजुश्री गोखले, अरुण आवटे, कुलदीप भोसले, अजित जाधव, रामचंद्र यादव, ओंकार जाधव, अशोक कांबळे, संतोष मोरे, रोहित कारंडे, कमलाकर भोसले, प्रदीप मराठे, राजू जाधव, आदी उपस्थित होते.
