कोल्हापूर:कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील तेरा गावासाठीच्या गांधीनगर पाणीपुरवठा योजनेचं कामं रखडल्याबद्दल ठेकेदार कंपनीची जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि आमदार अमल महाडिक यांनी चांगलीच कानउघाडणी केली. येत्या दोन महिन्यात कामात प्रगती दिसली नाही, तर मेघा इंजिनिअरिंगला ब्लॅकलिस्ट करण्याचा इशारा देण्यात आला आहे. विमानतळ विस्तारीकरणात बाधित होणाऱ्या रस्त्याच्या पर्यायी रस्ता करण्यासाठी तातडीन भूमी संपादन प्रक्रिया सुरू करावी, विमानतळ परिसरात भूमिगत विद्युत वाहिन्या आणि गांधीनगरसह विमानतळाच्या परिसरातील गावांसाठी घनकचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना आमदार अमल महाडिक यांनी संबंधित विभागांना दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आज हि बैठक झाली.
कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील विविध प्रश्नांसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आज बैठक पार पडली. जिल्हाधिकारी अमोल येडगे, आमदार अमल महाडिक, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, करवीर प्रांताधिकारी मोसमी चौगुले यांच्यासह महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, विमानतळ प्राधिकरण, बांधकाम आणि आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील 13 गावांसाठी 500 कोटी रुपयांची गांधीनगर नळपाणी पुरवठा योजना आमदार अमल महाडिक यांच्या प्रयत्नातून मंजूर झालीय .मेघा इंजीनियरिंग कंपनीला कामाचा ठेका मिळालाय. मात्र तीन वर्षात केवळ 51 टक्के काम झालेय. डिसेंबर मध्ये या कामासाठी एक वर्षाची मुदतवाढ दिली, पण अजून दोन टक्के सुद्धा काम केलेलं नाही. त्याबद्दल आमदार अमल महाडिक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. उन्हाळ्यामध्ये 13 गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या निर्माण होईल, तेव्हा नागरिकांना लोकप्रतिनिधीनी काय उत्तर द्यायचे असा सवाल अमल महाडीक यांनी केला. जॅकवेलचं काम तातडीनं सुरू करावं, पाईपलाईन साठी खुदाई केलेले रस्ते डांबरी करावेत अशा सूचना आमदार अमल महाडिक यांनी केल्या. ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी येडगे आणि अमल महाडिक यांनी कानउघडणी केली. पुढील दोन महिन्यात तेरा गावांच्या योजनेच्या कामाची प्रगती दिसली नाही तर ठेकेदार कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्याचा इशारा दिलाय. गांधीनगर परिसरात कचरा जाळण्याची आणि त्यातून निघणाऱ्या धुराची समस्या गंभीर बनलीय. या पार्श्वभूमीवर गांधीनगर आणि विमानतळालगतच्या गावातील कचऱ्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या. विमानतळ विस्तारीकरणात बाधित होणाऱ्या हुपरी- कोल्हापूर रस्त्याच्या पर्यायी रस्त्यासाठी जलद गतीनं भूमी संपादन प्रक्रिया सुरू करावी, विमानतळ परिसरातील विद्युत वाहिन्या भूमिगत करण्यासाठी प्रस्ताव तयार करावा, नेलीं, तामगाव रस्त्याच्या भूसंपादनची प्रक्रिया सोमवारपासून सुरू करावी, अशा सूचना आमदार महाडिक यांनी केल्या. या कामांमध्ये कोणत्याही प्रकारची चालढकल खपवून घेणार नाही असा इशारा जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि आमदार अमल महाडिक यांनी दिला.
