महायुतीला सत्ता द्या; कोल्हापूरचा स्वर्ग केल्याशिवाय राहणार नाही : मंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन

कोल्हापूर:
कोल्हापूर महानगरपालिकेची सत्ता महायुतीला द्या; कोल्हापूर शहराचा स्वर्ग केल्याशिवाय राहणार नाही, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ केले. विरोधी महाविकास आघाडीकडे विकासाचा कोणताही अजेंडा नसून कोल्हापूरचा सर्वांगीण विकास महायुतीच करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मंत्री  मुश्रीफ महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रभाग क्र. एक, पाच, सहा व १७ मध्ये जाहीर सभांमधून बोलत होते.

त्यांच्या समवेत खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, प्रा. जयंत पाटील, भाजपाचे शहराध्यक्ष विजय जाधव या प्रमुखांसह प्रभागनिहाय उमेदवार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंत्री  मुश्रीफ पुढे म्हणाले, वास्तविक महानगरपालिकेसह सर्वच स्थानिक स्वराज्य संस्था ह्या रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण यासारखे नागरिकांचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी असतात. कोल्हापूर महापालिकेची सत्ता महायुतीकडे दिल्यास शहरात विकासाची गंगा येईल. महायुतीचे सर्वच नगरसेवक गोरगरिबांच्या, सामान्य नागरिकांच्या जीवनात चांगले दिवस आणण्यासाठी कल्याणकारी योजना घराघरापर्यंत पोहोचवतील.

ते पुढे म्हणाले, केंद्रासह राज्यातील सत्ता महायुतीची आहे. विरोधी महाविकास आघाडी विकास कामांसाठी एक रुपयाही आणणार नसेल तर ते शहराचा कसा विकास करणार आहेत? असा सवालही मंत्री श्री. मुश्रीफ यांनी उपस्थित केला. गोरगरीब आणि श्रीमंत यांच्यातील सामाजिक आणि आर्थिक दरी रुंदावतच आहे. त्यामुळे गरीब आणि सामान्य माणसांसाठी काम करण्याची नितांत आवश्यकता आहे.

सीपीआर आणि शेंडा पार्क…..!
मुश्रीफ म्हणाले, महायुतीचे सरकार हे जनतेची सेवा करणारे सरकार आहे. छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय म्हणजेच सी. पी. आर. चा शंभर कोटी निधीतून कायापालट होत आहे. येत्या दोन-तीन महिन्यात या थोरल्या दवाखान्याचे रूप मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटल, जसलोक हॉस्पिटल यासारखे सुंदर होईल. शेंडा पार्कमध्ये ३० एकरांत राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय नगरी साकारत आहे. तिथे अकराशे बेडचे हॉस्पिटल निर्माण होत आहे. कोल्हापूरच्या एकाही रुग्णाला मुंबई किंवा पुण्याला उपचारासाठी जावे लागणार नाही.

राजकीय शत्रू…..!
मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, मी आणि सतेज पाटील आम्ही अनेक वर्ष मित्र होतो. आता आम्ही खाजगीत मित्र आहोत परंतु; राजकीय शत्रूच आहोत.

🤙 8080365706