कोल्हापूर:मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची जाहीर विटंबना करणाऱ्या विकृत मानसिकतेच्या अनिल मिश्रा व त्याच्या साथीदारांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी ‘पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना’ आक्रमक झाली आहे. संघटनेचे संस्थापक प्रमुख संतोष एस. आठवले यांनी यासंदर्भात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे ई-मेलद्वारे अधिकृत निवेदन पाठवून तीव्र निषेध नोंदवला आहे.
नेमकी घटना काय?
१ जानेवारी २०२६ रोजी, ज्या दिवशी देश शौर्य दिन साजरा करत होता, त्याच दिवशी ग्वाल्हेरमध्ये अनिल मिश्रा नावाच्या एका वकिलाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आगीच्या स्वाधीन करून अपमानजनक घोषणाबाजी केली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर देशभरातील आंबेडकरी अनुयायांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
काय आहेत प्रमुख मागण्या?
पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेने प्रशासनाकडे खालील मागण्या मांडल्या आहेत:
राष्ट्रीय सुरक्षा कायदा (NSA): आरोपींनी देशाच्या अस्मितेवर आघात केला असल्याने त्यांच्यावर तातडीने ‘NSA’ अंतर्गत कारवाई करावी.
वकिली सनद रद्द करा: कायद्याचे रक्षक असूनही कायद्याचा भंग करणाऱ्या आरोपीची वकिली सनद कायमस्वरूपी रद्द करण्यात यावी. जी
फास्ट ट्रॅक कोर्ट: या प्रणाचा तपास जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी.
आंदोलनाचा इशारा:
यावेळी बोलताना संस्थापक प्रमुख संतोष एस. आठवले म्हणाले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे देशाची शान आहेत. त्यांचा अपमान करणाऱ्या समाजकंटकांना भारतीय समाजात जागा नाही. जर प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली नाही आणि आरोपींना कठोर शासन झाले नाही, तर पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना संपूर्ण महाराष्ट्रभर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडेल.”
या निवेदनाच्या प्रती राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या दिल्ली आणि पुणे कार्यालयाला तसेच महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागालाही पाठवण्यात आल्या आहेत.
