नागपूर : आज विधीमंडळात पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून अतिशय गंभीर असा प्रश्न उपस्थित केला. पेठ वडगाव, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर येथे दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजी नगरपालिकेचे मतदान झाले. या मतदानासाठी वापरलेली मतदान यंत्रे मराठा सांस्कृतिक भवनात ठेवण्यात आली आहेत. या स्ट्राँग रूमवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत होते मात्र प्रशासनाने व पोलिस विभागाने हे कॅमेरे काढून टाकले आहेत. तसेच स्ट्राँगरूमच्या अगदी समोर ‘मोरे’ नावाच्या व्यक्तीचे घर आहे. त्यांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी घराला सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते. येथील मुख्याधिकाऱ्यांनी पोलिसांच्या बंदोबस्तात ते खाजगी सीसीटीव्ही काढून टाकले.
एखाद्या नागरिकाने स्वतःच्या घराच्या सुरक्षेसाठी लावलेले कॅमेरे काढण्याचा अधिकार प्रशासनाला कसा काय असू शकतो? यामुळे ईव्हीएम प्रक्रियेवर संशय निर्माण होण्यास वाव मिळतो. प्रशासनाची ही बेबंदशाही चालू असून, याची चौकशी करावी आणि हे काढलेले सीसीटीव्ही तातडीने पुन्हा बसवण्याचे आदेश सरकारने द्यावेत अशा आमदार सतेज पाटील यांनी सुचना केल्या.
याला उत्तर देताना राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणाची दखल घेऊन चौकशी केली जाईल असे आश्वासन दिले.
