कागल,प्रतिनिधी. येथील नगरपरिषदेची प्रभाग रचना कोणताही राजकीय पक्ष किंवा व्यक्ती यांच्या दबावाखाली न करता पारदर्शकपणे करावी.अशी मागणी मुख्याधिकारी तथा प्रशासक अजय पाटणकर यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे केली.
याबाबत अधिक माहिती अशी.राज्यातील महानगरपालिका,नगर परिषदा व नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका प्रस्तावित आहेत.त्या अनुषंगाने शासनाकडून प्रभाग रचने संदर्भातील सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. टप्पेनिहाय कालबद्ध कार्यक्रमानुसार कागल नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीच्या प्रभाग रचनेत पारदर्शकता असावी, राज्य निवडणूक आयोगाने निर्धारित केलेल्या नियमावलीनुसार प्रभाग रचना गुगल मॅप नुसार करावी. अशीही मागणी निवेदनात केली आहे.गत निवडणुकीआधी प्रभाग रचना करताना तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांना भौगोलिक संलग्नतेनुसार प्रभाग रचना करण्याबाबत नागरिकांकडून सांगण्यात आले होते. मात्र राजकीय दबावाला बळी पडून त्यांनी काही प्रभागात ती अंमलात आणली नसल्याचे या कार्यकर्त्यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. यावर मुख्याधिकारी यांनी माननीय निवडणूक आयोग व वरिष्ठ कार्यालय यांच्या याबाबतच्या आदेशानुसार पारदर्शकपणे प्रभाग रचना करण्यात येईल. याबाबतची माहिती वेळोवेळी नागरिकांना कळविली जाईल. प्रभाग रचनेबाबत नागरिकांच्या हरकती माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे नोंदविता येतील. या हरकतींवरील सुनावणीनंतर सूचनांवरील शिफारशी विचारत घेऊन प्राधिकृत अधिकाऱ्यांनी अंतिम केलेली प्रभाग रचना निवडणूक आयोगास मान्यतेसाठी पाठवण्यात येईल. यावेळी माजी उपनगराध्यक्ष रमेश माळी, संजय कदम, धैर्यशील इंगळे, शाहूचे संचालक सतीश पाटील, राजे बँकेचे संचालक दीपक मगर, अरुण गुरव,सुशांत कालेकर, नम्रता कुलकर्णी,प्रवीण कुराडे, राजेंद्र जाधव,आप्पासाहेब हुच्चे,नंदकुमार माळकर,युवराज पसारे,विवेक कुलकर्णी,प्रमोद कदम, प्रमोद सोनुले,आभिजीत कांबळे,बाळासो नाईक ,असिफ मकानदार,गजानन माने,संदीप पसारे,उत्तम पाचगावे,रोहित मोरे,दिलीप गाडीवड्ड आदी उपस्थित होते.
छायाचित्र कागल येथे नगरपालिकेच्या निवडणुकीसाठीची प्रभाग रचना पारदर्शी करण्याबाबतचे निवेदन मुख्याधिकारी अजय पाटणकर यांना देताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने देताना माजी उपनगराध्यक्ष रमेश माळी, संजय कदम, धैर्यशील इंगळे, शाहूचे संचालक सतीश पाटील, राजे बँकेचे संचालक दीपक मगर, अरुण गुरव,सुशांत कालेकर व इतर