मुंबई : महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्ययोजना व आयुष्मान भारत –प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत राबवण्यात येणाऱ्या रुग्णालयीन सेवा अधिक प्रभावी व लोकाभिमुख व्हाव्यात यासाठी रोजी मुंबई येथील वरळीतील राज्य कामगार विमा रुग्णालयात महत्त्वपूर्ण आढावा बैठकीत राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर उपस्थित होते.
यावेळी रुग्णसेवा गुणवत्ता वाढवण्यासाठी उपचार प्रक्रिया गतिमान करणे, सुपरस्पेशालिटी सुविधा उपलब्ध करणे आणि वेळेवर उपचार मिळावेत, यावर विशेष भर देण्यात आला. जिल्हा शासकीय रुग्णालये आणि अन्य सक्षम संस्थांना लवकरच या योजनेत ऑनबोर्ड करण्याचे निर्देश दिले. या योजनांचा लाभ मर्यादित घटकांपुरता न ठेवता, स्वस्त धान्य दुकान चालक, सरकार सेवा केंद्र चालक यांसारख्या घटकांना देखील या योजनांतर्गत जोडण्यासाठी पात्र लाभार्थ्यांची माहिती संकलित करून त्यांना योजना पोहोचवण्याचे आदेश आबिटकर यांनी दिले.
योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अंगीकृत रुग्णालये, आरोग्य मित्र, क्षेत्रीय अधिकारी, जिल्हा समन्वयक व मुख्यालयातील कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचा सविस्तर आढावा घेऊन उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांना “बाळासाहेब ठाकरे पुरस्कार” देण्यात यावा, तसेच त्यासाठी लवकरच सोहळा आयोजित करण्यात यावा, असे निर्देश आबिटकर यांनी दिले.
नागरिकांना दर्जेदार, वेळेवर आणि सुलभ आरोग्यसेवा मिळावी, हेच या सर्व निर्णयामागचे उद्दिष्ट आहे.