कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जुन्या शिंगणापूर योजनेमधील पंपिंग स्टेशन अद्ययावत करण्यासाठी आ. अमल महाडिक यांनी पालकमंत्र्यांच्याकडे केली निधीची मागणी

कोल्हापूर : शहराला अखंडित पाणीपुरवठा करण्यासाठी उभारण्यात आलेल्या काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेत वारंवार होणाऱ्या बिघाडांमुळे संपूर्ण शहराला पाणीबाणीला सामोरे जावे लागत आहे. अनेकदा पाणीपुरवठा ठप्प झाल्यामुळे नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांची आमदार अमल महाडिक यांनी भेट घेऊन कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जुन्या शिंगणापूर योजनेमधील पंपिंग स्टेशन अद्ययावत करण्यासाठी निधी देण्याची मागणी केली.

सध्या शिंगणापूर योजनेमध्ये ७ पंपाद्वारे पाणी उपसा केला जातो. त्यापैकी ३ पंप नुकतेच बदलण्यात आले आहेत.७१० अश्‍वशक्तीचे दोन पंप बदलण्यासाठी ४ कोटी ५० लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. हा निधी जिल्हा नियोजन समिती मधून तात्काळ उपलब्ध करून देण्यासंदर्भात बैठक घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना द्यावेत अशी मागणी पालकमंत्री यांच्याकडे आ. महाडिक यांनी निवेदनाद्वारे केली. थेट पाईपलाईन द्वारे कोल्हापूर शहराला होणारा पाणीपुरवठा खंडित झाल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून शिंगणापूर पाणी योजनेला बळकटी द्यावी या मागणीचा सकारात्मक विचार करण्याची ग्वाही मंत्री आबिटकर यांनी दिली.

🤙 9921334545