कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या भूगोल विभागाने 2023 मध्ये सुरू केलेल्या एम.एससी. जिओइन्फॉर्मेटिक्स या अभ्यासक्रमाच्या पहिल्याच बॅचने अत्यंत थोड्या कालावधीत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. अभ्यासक्रमातील बहुतांश विद्यार्थ्यांना अंतिम परीक्षेपूर्वीच देशातील नामांकित व बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरी मिळाल्यामुळे हा अभ्यासक्रम आणि विभागाचा एक अभिमानास्पद टप्पा ठरला आहे.
हे यश विद्यार्थ्यांच्या मेहनतीबरोबरच विभागातील आधुनिक तांत्रिक सुविधा, उद्योगाभिमुख अभ्यासक्रम रचना, व अनुभवी प्राध्यापकांच्या सातत्यपूर्णमार्गदर्शनामुळे शक्य झाले आहे. GIS, Remote Sensing, UAV (Drone Technology), WebGIS, Python Programming, DBMS, DGPS, Total Station Surveying यांसारखे रोजगारक्षम घटक अभ्यासक्रमात समाविष्ट असल्यामुळे विद्यार्थीसैद्धांतिक आणिप्रात्यक्षिक दोन्ही पातळीवर कुशल बनले आहेत.
एम.एससी. जिओइन्फॉर्मेटिक्सचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये भू-स्थानिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने भौगोलिक, पर्यावरणीय, शहरी आणिग्रामीण समस्यांचे विश्लेषण व उपाययोजना करण्याची क्षमता विकसित करणे हा आहे. विद्यार्थ्यांना Advance ArcGIS Pro, ArcGIS Online, QGIS, ERDAS Imagine, DGPS, Total Station, DJI Phantom 4 Pro Drone, Python Setup, Spatial DBMS अशा आधुनिक सॉफ्टवेअर व उपकरणांचा वापर करून फील्ड ट्रेनिंग, 3D मॅपिंग, वेब मॅपिंग, आपत्ती मूल्यांकन, कृषी व शहरी नियोजन आदी बाबतीत प्रत्यक्ष कौशल्य मिळाले आहे. उद्योगांशी थेट संपर्क साधत प्रोजेक्ट्स, इंटर्नशिप्स, व मुलाखत प्रशिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची सर्वांगीण तयारी झाली आहे.
विभागप्रमुख प्रा. डॉ. सचिन पन्हाळकर, डॉ. प्रशांत पाटील, डॉ. अभिजित पाटील, डॉ. सुधीर पोवार आणिडॉ. विद्या चौगुले यांचे अभ्यासक्रमाच्या संकल्पनेपासून ते अंतिम प्लेसमेंटपर्यंत मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी मोलाचे ठरले. त्यांनी उद्योगांशी थेट संपर्क साधून प्लेसमेंट संधी निर्माण केल्या आणि विद्यार्थ्यांना योग्य प्रशिक्षण, प्रेझेंटेशन व करिअर मार्गदर्शन दिले. यामुळे अभ्यासक्रमाची व्यावसायिक गुणवत्ता अधिक उंचावली आहे.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांची त्यांच्या पदांसह नावे पुढीलप्रमाणे:
- प्रणिल चव्हाण– UAV Co-Pilot, Schnell Drone Technology Ltd., पुणे
- अजय गवळी– GIS Executive, Equinox Drone Ltd., बेंगळुरू
- सुषांत गुरव– GIS Analyst, Sthapatya Consultant Pvt. Ltd., पुणे
- विशाल पोवार– Jr. GIS Analyst, Deduce Technology Pvt. Ltd., बेंगळुरू
- आदिती काशिद– तालुका कृषी व्यवस्थापक, जिल्हा परिषद, कोल्हापूर
या निवडी अभ्यासक्रमाच्या रोजगारक्षमतेचे उत्तम उदाहरण असून, विद्यार्थ्यांनी अंतिम परीक्षा होण्यापूर्वीच नोकरी मिळवित या अभ्यासक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले आहे.
भविष्याची दिशा-
जिओइन्फॉर्मेटिक्स हे क्षेत्र जलविज्ञान, पर्यावरण, शहरी नियोजन, आपत्ती व्यवस्थापन, स्मार्टसिटी, कृषी विश्लेषण यासारख्या विविध क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर करिअर संधी निर्माण करते. पुढील काळात डेटा सायन्स व आर्टिफिशियल इंटेलिजन्ससोबत याचे एकत्रीकरण होऊन या क्षेत्राचे महत्व आणखी वाढणार आहे.
एम.एससी. जिओइन्फॉर्मेटिक्स हा अभ्यासक्रम कोल्हापूर विभागातील एक उद्योगाभिमुख, तंत्रज्ञान–केंद्रित आणिरोजगारक्षम पर्याय म्हणून उदयास येत असून, शिवाजी विद्यापीठाचा भूगोल विभाग भू–तंत्रज्ञान शिक्षणात नवे मापदंड प्रस्थापित करीत आहे. अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू असून इच्छुक विद्यार्थ्यांनी विभागाशी ०२३१ २६०९१९४ किंवा ९७६५३९६२७१ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.