जिजाऊ समितीच्या प्रशिक्षणातून महिलांनी यशस्वी व्यावसायिक बनावे-नवोदिता घाटगे

कागलमहिलांनी चूल आणि मुल या पारंपारिक संल्पनेतून बाहेर पडून छोटे-मोठे व्यवसाय करावेत.स्वतःच्या पायावर उभे रहावे.यासाठी विविध प्रशिक्षण शिबीरांचे आयोजन करीत आहोत.याचा लाभ घेऊन महिलांनी यशस्वी व्यावसायिक बनावे.
असे आवाहन राजे बॅंकेच्या चेअरमन सौ.नवोदिता घाटगे यांनी केले.

 

येथील श्रीराम मंदिरमधील सभागृहात राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशन संचलित राजमाता जिजाऊ महिला समितीमार्फत आयोजित तीन दिवशिय मेहंदी प्रशिक्षण शिबीराच्या समारोपवेळी त्या बोलत होत्या. तीनशेहून अधिक महिलांनी सहभागी होत या शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या प्रशिक्षणार्थींना घाटगे यांच्या हस्ते सहभाग प्रमाणपत्र वितरित केले.

सौ.घाटगे पुढे म्हणाल्या,गेल्या आठ वर्षापासून शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या प्रोत्साहनातून महिलांसाठी विविध प्रशिक्षण शिबिरांचे विभागावर आयोजन केले जात आहे. प्रशिक्षणानंतर राजे बँकेच्या माध्यमातून अर्थसहाय्य केले जाते.तसेच महिलांनी तयार केलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी दिवाळी बाजार,विविध दुकानांमध्ये अशा वस्तूंसाठी स्टॉल आरक्षित ठेवले जातात. यापुढेही महिलांच्या मागणीनुसार प्रशिक्षण शिबिर आयोजित करू.
देवयानी ऐतवडेकर ही पंधरा वर्षीय प्रशिक्षणार्थी म्हणाली, मला मेहंदीबाबत केवळ जुजबी माहिती होती.या शिबिरातील प्रशिक्षणामुळे आता मी चांगली मेहंदी काढू शकते

यावेळी प्रशिक्षिका रचना दोशी,मालाश्री चांदेकर,सुमन पाटील,श्रुती बागेवाडी,जयश्री चोगले,वंदना चव्हाण यांनीही मनोगत व्यक्त केले.

व्यासपिठावर राजे बॅंकेच्या संचालिका नम्रता कुलकर्णी,शीतल घाटगे आदी उपस्थित होत्या.
नूतन घाटगे यांनी स्वागत केले.रेवती बरकाळे यांनी आभार मानले.