कोल्हापूर : २००१ सालातल्या चैत्र महिन्यातील ज्योतिबा यात्रेत म्हणजेच आजपासून २५ वर्षांपूर्वी सहज भावनेतून, समाजातील संवेदनशील व्यक्तींनी एकत्र येऊन सुरू केलेला सहजसेवा ट्रस्ट आज रौप्य महोत्सव साजरा करत आहे. आणि अभिमान ही आहे.सहजसेवा ट्रस्टच्या अन्नछत्राची सुरुवात होऊन आज दोन तपे होऊन गेली. (सर्वसाधारण बारा वर्षानंतर एक पिढी बदलते असे म्हणतात) २००१ साली ४५ ते ५० वर्षाचे तरुण आज ७० च्या पलीकडे गेलेले आहेत. पण आजही २००१ च्या जिद्दीने व पुढील पिढीच्या हातात हात घालून या वर्षाचे अन्नछत्र पहिल्याच उत्साहाने चालू आहे आणि चाली राहणार आहे. यावर्षी २५ वे अन्नछत्र येत्या १० ते १३ एप्रिल अखेर आयोजित केले आहे अशी माहिती सहज सेवा ट्रस्टचे संमती मिरजे, प्रमोद पाटील, चिंतन शहा, मनीष पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी शिवरूप सूर्यकांत गायकवाड,रोहित गायकवाड,सुनील कुंभार उपस्थित होते.
महाराष्ट्र मध्ये देव देवतांच्या दरवर्षी ज्या यात्रा भरतात त्यापैकी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात प्रमुख व मोठी यात्रा असते ती वाडी रत्नागिरी येथील जोतिबा देवाची चैत्र यात्रा. या यात्रेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यातून सात ते आठ लाख यात्री करून मोठ्या उत्साहाने सहभागी होतात.लाखोंच्या संख्येने यात्रेसाठी भाविक डोंगरावर येतात .यात्रेसाठी येणाऱ्या जोतिबा भक्तांच्या सेवेसाठी कोल्हापूरच्या सहज सेवा ट्रस्ट या सेवाभावी संस्थेतर्फे गेली २४ वर्षे सातत्याने जोतिबा डोंगरावरील गायमुख या परिसरामध्ये अन्नछत्र चालवण्यात येते.प्रति वर्षाप्रमाणे यंदाही हे अन्नछत्र दिनांक १० ते १३ एप्रिल २०२५ या कालावधीमध्ये दिवस व रात्र चालू राहणार आहे. मागील वर्षी झालेली गर्दी, तसेच मागील वर्षापासून शासनाने व पोलीस प्रशासनाने चार चाकी वाहनांचा तळ अन्नछत्राच्या शेजारी म्हणजेच गायमुखावर केलेला असल्यामुळे अन्नछत्राच्या ठिकाणीच जवळजवळ दोन हजार चार चाकी वाहनांमधून येणारा भक्तगण हा अन्नछत्राचा नक्कीच लाभ घेणार आहेत. त्यामुळे यावर्षी दोन लाखावर यात्रेकरू या अन्नछत्रास भेट देतील या अंदाजाने अन्नछत्राची संपूर्ण तयारी करण्यात आली आहे.असे यावेळी संयोजकांनी सांगितले.
भक्तांच्या सोयी करता सहज सेवा ट्रस्टचे अन्नछत्र हे २४ तास चालू असणार आहे. तसेच भक्तांना २४ तास चहा मिळणार आहे व दुपारच्या वेळी मठ्ठा दिला जाणार आहे.यात्रा सुरळीत पार पडावी याकरिता कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या आरोग्य विभाग, पोलीस दल, होमगार्ड, बांधकाम विभाग, ग्रामपंचायत, परिवहन विभाग, विद्युत विभाग त्याचबरोबर अनेक सेवाभावी संस्थाचे स्वयंसेवक यांना पोटभर जेवण मिळावे याकरिता सहज सेवा ट्रस्ट तर्फे जेवण देण्यात येते. सदरचे जेवण पॅकेटमध्ये भरून त्या त्या विभागातील लोकांना पोहोचवण्याचे काम पोलीस दल व पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती करते.
गायमुखावर अन्नछत्रासाठी ११० बाय १४० म्हणजेच पंधरा हजार चौरस फुटाचा मोठा मांडव उभारण्यात आला आहे. त्याचबरोबर चहा व मठ्ठ्याकरिता वेगळा मंडप घालण्यात आलेला आहे.
बैलांचीही सोय
आजच्या आधुनिक काळात ही आपल्या गावातून आपल्या परिवारासह बैलगाडीतून डोंगरावर येणारे भाविक ही आहेत. अशा बैलगाडी घेऊन येणाऱ्या भाविकांच्या बैलांना गेल्या अनेक वर्षापासून शेंगदाणा पेंड व भुसा दिला जातो तो यावर्षीही शेंगदाणा पेंड व भुसा दिला जाणार आहे.
दरवर्षी अन्नछत्राची व्याप्ती वाढत चाललेली आहे. वाढणाऱ्या भक्तांच्या संख्येच्या अंदाजाप्रमाणे अन्नछत्रासाठी साहित्यही मोठ्या प्रमाणात लागत आहे. दोन लाख भाविक अन्नछत्राचा लाभ घेतील या दृष्टीने खालील प्रमाणे साहित्याची जमवाजमव केलेली आहे.
१५००० किलो बासमती तांदूळ, ३००० किलो तूर डाळ, ६००० किलो रवा, दहा हजार किलो साखर, ४५० डबे तेल, ७००० लिटर दूध, ३०० किलो चहा पावडर, ३०० किलो मूग, ३०० किलो काळा घेवडा, ३००० किलो बटाटा, चार हजार किलो कांदा, २०० किलो लसूण, ४ टन लाकूड, २०० गॅस सिलेंडर, याव्यतिरिक्त ट्रक भरून भाजीपाला, गोडा मसाला, चटणी व इतर मसाल्याचे पदार्थ लागणार आहेत.
जेवण करण्यासाठी २० मुख्य आचारी व त्यांचे मदतनीस, भाजी चिरण्यासाठी ३० बायका ५० वाढपी भांडी धुण्यासाठी ७० बायका ताटे स्वच्छ पुसून देण्यासाठी व इतर कामासाठी ५० मजूर तर जेवण वाढण्यासाठी सहज सेवा ट्रस्टचे विश्वस्त स्नेही हितचिंतक असे ४०० स्वयंसेवक अहोरात्र काम करणार आहेत.
अन्नछत्राची संपूर्ण तयारी पूर्ण झालेली असून आवश्यक असणाऱ्या सर्व परवानग्या जिल्हा प्रशासन, पंचायत समिती, ग्रामपंचायत, अन्न व औषध प्रशासन यांच्याकडून घेण्यात आलेले आहेत आणि त्यांचे सहकार्य ही लाभत आहे. अशाप्रकारे यात्रेकरूंनी सहज सेवा ट्रस्ट मार्फत आयोजित या अन्नछत्राचा लाभ घ्यावा असे आवाहन सयोजकांनी केले आहे.
रक्तदान शिबिर
या व्यतिरिक्त अन्नछत्राच्या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे सीपीआर रुग्णालयाच्या मदतीने रक्तदान शिबिर ही आयोजित करण्यात येणार आहे. नंदादीप आय हॉस्पिटलच्या सहकार्याने डोळ्याची मोफत तपासणी करण्यात येणार आहे. यात्रे करून योग्य ती वैद्यकीय सेवा मिळावी याकरिता शासनाच्या आरोग्य विभागामार्फत २४ तास वैद्यकीय सेवा व एक रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात येणार आहे.
ज्या दानशूर व्यक्ती अथवा संस्थाना सदर उपक्रमास मदत करावयाची आहे त्यांनी सहज सेवा ट्रस्ट, ३९८ आशिष चेंबर्स, बसंत बहार सिनेमा समोर, स्टेट बँक कोषागर शाखा बिल्डिंग, शाहूपुरी, कोल्हापूर येथे संपर्क साधावा अथवा अधिक माहितीसाठी मोबाईल नंबर ७४४७४१२७५५ या नंबर वर फोन करावा