कोल्हापूर:स्त्रीला केवळ देहरूपात पाहू नये, तर स्त्री म्हणजे शौर्य, वीरता, प्रेम, वात्सल्य आणि ममता यांचा सुरेख संगम आहे. त्यामुळं सर्वांनी स्त्रीयांचा आदर आणि सन्मान करावा, असं आवाहन योग ऋषी रामदेव बाबा यांनी केलं. कोल्हापुरातील गांधी मैदान इथं झालेल्या प्रवचनातून रामदेवबाबा यांनी, जागतिक महिला दिनानिमित्तानं मातृशक्ती आणि स्त्रीशक्तीची महती स्पष्ट केली. दरम्यान आज सकाळी गांधी मैदानावर १० हजाराहून अधिक महिलांचा कुंकुमार्चन सोहळा झाला.
जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून, पतंजलि योग समितीच्यावतीनं आज कोल्हापुरातील गांधी मैदान इथं १० हजाराहून अधिक महिलांचा कुंकुमार्चन सोहळा झाला. तसंच रामदेवबाबा यांचं योग प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन झालं. खासदार धनंजय महाडिक आणि सौ. अरूंधती महाडिक यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आज सकाळी दहा वाजता स्वामी रामदेवबाबा यांचं कोल्हापुरात आगमन झालं. प्रारंभी त्यांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचं आणि मातृलिंग दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्या समवेत खासदार धनंजय महाडिक, सौ. अरुंधती महाडिक उपस्थित होत्या. देवस्थान समितीच्यावतीनं व्यवस्थापक महादेव दिंडे यांच्या हस्ते रामदेवबाबा यांचा देवीची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर स्वामी रामदेवबाबा यांनी गांधी मैदानातील कुंकुमार्चन सोहळ्याला हजेरी लावली. पतंजली योग समिती आणि भागीरथी संस्थेच्यावतीनं आयोजित कुंकुमार्चन सोहळ्यात १० हजाराहून अधिक महिला सहभागी झाल्या होत्या. रामदेवबाबा यांच्या हस्ते आणि खासदार धनंजय महाडिक, सौ. अरुंधती महाडिक यांच्या उपस्थितीत सुरूवातीला कुमारिका पूजन झालं. शास्त्रशुध्द मंत्रोच्चारात झालेल्या या सोहळ्यात सुहास जोशी, स्वप्निल मुळे यांनी कुंकुमार्चन सोहळ्यासाठी मार्गदर्शन केलं. कुंकुमार्चन सोहळा म्हणजे कौटुंबिक सुखसमृध्दी, सौभाग्य रक्षण याचं प्रतिक असल्याचं त्यांनी सांगितलं.
कुंकूमार्चन सोहळा झाल्यानंतर, खासदार धनंजय महाडिक यांचं भाषण झालं. दैनंदिन जीवनात अनेक महिला आरोग्याकडं दुर्लक्ष करतात. त्यांना निरोगी आयुष्य जगण्यासाठी योगाचं महत्व कळवण्यासाठी रामदेवबाबा यांना बोलावल्याचं त्यांनी सांगितलं. त्यानंतर स्वामी रामदेवबाबा यांनी नारीशक्तीचं महत्व स्पष्ट करणारं प्रवचन झालं. मानवी जीवनात स्त्रीशक्तीचं महत्व अनन्य साधारण आहे. स्त्रिया म्हणजे प्रेम, करुणा, वात्सल्य, शांती, संवेदना यांचं प्रतिक आहेत. म्हणूनच त्यांना जननी असं म्हंटलं जात असल्याचं रामदेवबाबा यांनी सांगितलं. दरम्यान रामदेवबाबा यांनी मानवी जीवनातील योगाचं महत्व स्पष्ट केलं. दीर्घायुषी आणि निरोगी आयुष्य जगण्यासाठी योग महत्वाचा आहे, असं रामदेवबाबा म्हणाले.
खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रेरणेतून सौ. अरुंधती महाडिक महिला सक्षमीकरणाची चळवळ उत्तम प्रकारे चालवत आहेत. त्यांचं कार्य देशात रोल मॉडेल ठरावं, अशा आशीर्वादही रामदेवबाबा यांनी दिला. यावेळी साध्वी देवप्रियाजी यांचंही मार्गदर्शनपर भाषण झालं. स्त्री म्हणजे मातृशक्ती असल्यानं त्या आपल्या मुलांवर चांगले संस्कार रुजवतात, असं सांगत, त्यांनी भारतीय संस्कृती, शिक्षणपध्दती, आरोग्य यावर भाष्य केलं. दरम्यान करो योग-रहो निरोग… घर घर हम जायेंगे-सबको योग सिखायेंगे… रोज करो कपालभाती-नही रहेगी रोगकी भीती… मुलं घडवूया संंस्कारी-योग पोहचवू घरोघरी… अशा आशयाचे लावलेले फलक आज लक्षवेधी ठरले. यावेळी चॅनल बी चे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक, वैष्णवी महाडिक, पतंजली योग समितीच्या वरिष्ठ महिला प्रभारी सुधा अळ्ळीमोरे, सन्मती मिरजे, छाया पाटील, प्रमोद पाटील, एन. पी. सिंग, स्वामी भारतजी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. दरम्यान शंभूराजे मर्दानी खेळ संस्थेच्या युवतींनी सादर केलेल्या प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची मनं जिंकली. रामदेवबाबा यांनीही या सादरीकरणामुळं प्रभावित होत, युवतींना व्यासपीठावर बोलावून त्यांचा सत्कार केला. तसंच खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते रामदेवबाबा यांच्यासह मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.