माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर शिवसेना शिंदेगटात प्रवेश करणार

कुंभोज  (विनोद शिंगे)

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदेगटाचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय असलेले हातकणंगलेचे माजी आमदार व गोकुळ दूध संघाचे संचालक डॉ. सुजित मिणचेकर हे गुरुवारी २७ रोजी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.

 

 

तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्रामध्ये मोठा राजकीय भूकंप झाला. शिवसेनेचे एकनाथ शिंदे हे बंड करत तब्बल 40 आमदार घेऊन गुहाटीला गेले. त्यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील एकनाथ शिंदे यांचे अत्यंत निकटवर्तीय असलेले शिवसेनेचे माजी आमदार डॉ.सुजित मिणचेकर हे देखील शिंदेसेनेत जातील असा विश्वास अनेकांना होता मात्र मिणचेकर यांनी अडचणीच्या काळी उद्धव ठाकरे यांची साथ न सोडण्याचा निर्णय घेतला व विधानसभा निवडणुकीपर्यंत शिवसेना ठाकरे गटातच राहिले.

काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभेत निवडणुकीवेळी महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माध्यमातून डॉ. मिणचेकर यांना उमेदवारी देण्याचा शब्द उद्धव ठाकरे यांनी दिला असल्याची विश्वसनीय माहिती होती. मात्र ऐनवेळी उमेदवारी न मिळाल्याने ते माघारीच्या एक दिवस आधी स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये प्रवेश करत निवडणूक लढवली मात्र त्यांना अपयश आले. असे असले तरी त्यांनी आपले सामाजिक कार्य व लोकसंपर्क कायम सुरू ठेवला आहे.

परंतु त्याला मर्यादा येत आहेत. सध्या महाराष्ट्रातील अनेक राजकीय घडामोडी पाहता व सुजित मिणचेकर यांचा एकनाथ शिंदे गटाच्या नेत्यांशी कामानिमित्त वाढता संपर्क पाहता ते शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा पुन्हा एकदा जोर धरून होती. त्याला आता पूर्णविराम मिळाला असून निवडणुकीवेळी शिवसेना ठाकरे गटाला रामराम केलेले डॉ. मिणचेकर आता खासदार धैर्यशील माने यांच्या माध्यमातून गुरुवारी 27 रोजी पक्षप्रमुख व उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेचे आजी-माजी पदाधिकारी, आजी माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य, तसेच हजारो मिणचेकर प्रेमीसह पुन्हा शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

🤙 9921334545