कोल्हापूर: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्राचे वाचन करून नवयुवकांनी त्यापासून प्रेरणा घ्यावी आणि राष्ट्रउभारणीच्या कार्यामध्ये योगदान देण्यास सिद्ध व्हावे, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी आज केले.
शिवाजी विद्यापीठात १६ फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या राष्ट्रीय एकात्मता शिबिराचा आज समारोप समारंभ झाला. त्यावेळी अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. या शिबिरात महाराष्ट्रासह १२ राज्यांतील २१ विद्यापीठांतील राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक सहभागी झाले. पुणे येथील राष्ट्रीय सेवा योजना प्रादेशिक संचालनालय आणि शिवाजी विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस.) कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या शिबिराचा समारोप विविध राज्यांच्या विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम, दीपोत्सव आणि पारितोषिक वितरण आदी कार्यक्रमांनी झाला. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, राष्ट्रीय सेवा योजनेच्या प्रादेशिक संचालनालयाचे प्रादेशिक संचालक अजय शिंदे, यूथ ऑफिसर सुमंतकुमार यादव प्रमुख उपस्थित होते.
यावेळी अनेक सहभागी कार्यक्रम अधिकारी आणि स्वयंसेवक यांनी आपल्या मनोगतांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती सोहळ्यात सहभागी होता आले आणि त्यामुळे शिवाजी महाराजांविषयी अधिक जाणून घेता आले, याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. त्याचा धागा पकडून कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांचे राष्ट्र उभारणीतील योगदान, त्यांचा सर्वधर्मसमभाव, त्यांची सहिष्णु वृत्ती, सर्वांना समानतेची वागणूक देत स्वराज्यकार्यात सामावून घेण्याची वृत्ती, स्त्रियांप्रती आदरभाव या सर्व गोष्टी आपल्याला विकसित भारताची उभारणी करण्यासाठी प्रेरणादायी आणि आदर्शवत आहेत. हे आदर्श घेऊन भावी जीवनात वाटचाल केल्यास आपण आपल्या समाजाच्या आणि देशाच्या प्रगतीमध्ये योगदान देऊ शकतो.
प्र-कुलगुरू डॉ. पाटील म्हणाले, एकमेकांशी निकोप स्पर्धा असणे आवश्यक असतेच, पण त्याहूनही सर्वांनी एकत्र येऊन जिंकण्यातील आनंद हा अधिक निर्मळ असतो. स्पर्धेपेक्षा सहकार्यशील वृत्तीला महत्त्व दिल्यास देशकार्य आणि मानवतावादाची सेवा करणे सहजशक्य आहे. संस्कृतीमधील प्रतीकांमागील वैज्ञानिक तथ्ये समजून घेण्याच्या अनुषंगानेही उपक्रम राबविण्याची आवश्यकता त्यांनी विषद केली.
यावेळी अजय शिंदे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सुमंतकुमार यादव यांनी अहवाल सादरीकरण केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते सहभागी विद्यापीठांच्या संघांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. तसेच, विविध स्पर्धांमधील विजेत्यांनाही पारितोषिके प्रदान करण्यात आली. डॉ. पी.एच. विद्यानंद, डॉ. के. सुखुना, डॉ. के. जयप्पा, डॉ. प्रदीप औसेकर, डॉ. कावेरी या विविध विद्यापीठांच्या कार्यक्रम अधिकाऱ्यांसह शानूर शेख (गोवा), आदित्य कुमार (दिल्ली), गीतांजली मांगो (पश्चिम बंगाल), मोहिनी पटेल (गुजरात), काव्या (आंध्र प्रदेश) या स्वयंसेवकांनीही शिबिराच्या यशस्वी आयोजनाविषयी आपली मनोगते व्यक्त केली. शिवाजी विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. तानाजी चौगुले यांनी आभार मानले.
शिवाजी विद्यापीठाला दोन पारितोषिके
शिवाजी विद्यापीठाच्या स्वयंसेवकांना पारंपरिक वेशभूषेमध्ये द्वितिय आणि पोस्टर सादरीकरणामध्ये तृतीय क्रमांक मिळाला. पारंपरिक वेशभूषेत कोलकता येथील पश्चिम बंगाल विद्यापीठास प्रथम व भुवनेश्वर विद्यापीठ, ओडिशा यांना तृतीय क्रमांक मिळाला. पोस्टर सादरीकरणात पश्चिम बंगालला प्रथम आणि भारती विद्यापीठ, पुणे यांना द्वितिय क्रमांक मिळाला. समूह नृत्य स्पर्धेत जळगावच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठास प्रथम, धारवाडच्या कर्नाटक विद्यापीठास द्वितिय आणि केरळच्या तिरुअनंतपूरम विद्यापीठास तृतीय क्रमांक मिळाला.
सांस्कृतिक कार्यक्रम आणि दीपोत्सवाचा उत्साह
काल सायंकाळच्या सत्रात सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण आणि दीपोत्सवाने राष्ट्रीय एकात्मता शिबिरातील उपक्रमांची सांगता करण्यात आली. यावेळी विविध विद्यापीठाच्या स्वयंसेवकांनी आपापल्या राज्याच्या संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या एकल, समूह नृत्यांचे तसेच प्रबोधनपर लघुनाटिका, नकलांचे सादरीकरण केले. याला सर्वच राज्यांच्या स्वयंसेवकांचा मोठा उत्साही प्रतिसाद लाभला. त्यानंतर विद्यापीठ प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्यासमोर भारताच्या नकाशाची रांगोळी काढण्यात आली आणि त्याभोवती दीपांची आरास करून दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी कुलसचिव डॉ. शिंदे, संचालक डॉ. चौगुले यांच्यासह अजय शिंदे, सुमंतकुमार यादव आणि कार्यक्रम अधिकारी, स्वयंसेवक उपस्थित होते.