पायाभूत सुविधा चांगल्या, खंडपीठ कोल्हापुरातच करा ; आ. सतेज पाटील यांची मागणी 

कोल्हापूर : खंडपीठासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा कोल्हापुरात चांगल्या आहेत. सध्या विमानसेवा उत्तम सुरु असून भौगोलिक दृष्ट्या कोल्हापूर सगळ्यांना सोयीस्कर आहे. त्यामुळे खंडपीठ कोल्हापुरातच करा अशी आग्रही मागणी काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना केली.

 

आमदार पाटील म्हणाले, कोल्हापुरात खंडपीठ व्हावे ही गेल्या ३० ते ४० वर्षापासूनची मागणी आहे. कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी यासह बाकीच्या जिल्ह्यांतील लोकांना न्यायालयीन कामकाजासाठी मुंबईला जावे लागते. या सातही जिल्ह्यातील लोकांनी गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापुरातच खंडपीठाची मागणी सातत्याने उचलून धरली आहे. त्यामुळे सरकारने हा निर्णय लवकरात लवकर घ्यावा. खंडपीठासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा कोल्हापुरात चांगल्या आहेत. भौगोलिक दृष्ट्या कोल्हापूर सगळ्यांना सोयीस्कर आहे. मुंबई हायकोर्टात जवळजवळ दोन लाख केसेस या सात जिल्ह्यांतून आहेत. त्यामुळे कोल्हापूर हे सर्वांना सोयीस्कर पडणारे ठिकाण असून खंडपीठ कोल्हापुरातच व्हावे, अशी अपेक्षा आमदार पाटील यांनी व्यक्त केली.