कोल्हापूर: देशात उत्तम औद्योगिक पर्यावरण निर्माण होण्यासाठी शिक्षण, उद्योग आणि शासन या तिन्ही क्षेत्रांचा समन्वय झालाच पाहिजे, असे प्रतिपादन आयआयटी, कानपूरचे माजी संचालक तथा उज्जैनच्या अवंतिका विद्यापीठाचे कुलपती ‘पद्मश्री’ डॉ. संजय धांडे यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात आजपासून ‘विकसित भारत-२०४७ साठी नवोपक्रम आणि स्टार्टअप्स’ या विषयावर आयोजित ‘शिक्षण, उद्योग आणि शासन परिषद १.०’ या परिषदेच्या उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते. तर, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील आणि कुलसचिव डॉ. विलास शिंदे प्रमुख उपस्थित होते. विद्यापीठाच्या नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य केंद्र आणि एसयूके रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या परिषदेला पीएम-उषा अर्थसहाय्य लाभले आहे.
डॉ. संजय धांडे म्हणाले, आजवर शिक्षण आणि उद्योग यांच्याविषयीच्या परिषदा पाहिल्या आहेत. मात्र, शिवाजी विद्यापीठात प्रथमच शासन हा घटक त्यात समाविष्ट झाला आहे. शासन म्हणजे व्यापक अर्थाने समाज ही बाब लक्षात घेऊन समाजाच्या अपेक्षांची आणि गरजांची पूर्ती करणारे स्टार्टअप निर्माण व्हावेत, अशी भूमिका त्यामागे दिसून येते. आपल्या समस्यांवर आपणच उपाय शोधले पाहिजेत, या दृष्टीने विद्यार्थ्यांनी आणि विशेषतः अभियंत्यांनी स्टार्टअपकडे गांभिर्याने पाहण्याची गरज आहे. त्याही पुढे जाऊन शिक्षकांकडून स्टार्टअपविषयी केवळ मार्गदर्शन नव्हे, तर कृतीशील उदाहरणे निर्माण व्हावीत आणि अशा सर्वांना बँकांनी आवश्यक ते पाठबळ पुरवावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. अणुऊर्जा, संरक्षण या क्षेत्रांमध्ये स्टार्टअप विकासाच्या, संशोधनाच्या अनेक संधी असून त्या दृष्टीने अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमांसह उपयोजनातही मोठे बदल करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
‘कोल्हापूरला उद्योजकतेचा मोठा वारसा’
कोल्हापूरला उद्योजकता संस्कृतीचा मोठा वारसा लाभला आहे. फिरता रंगमंच निर्माण करणाऱ्या बाबूभाई मिस्त्रींपासून ते पिस्टन्ससाठी जगप्रसिद्ध असणाऱ्या मेनन यांच्यापर्यंत अनेक उदाहरणे सांगता येतील. फौंड्रीपासून ते वाद्यनिर्मितीपर्यंतचे अनेक उद्योग व्यवसाय येथे बहरले आहेत. हा वारसा सांभाळत असताना आता आपल्याला या उद्योगांची वेगळ्या प्रकारे बांधणी करावी लागणार आहे. त्यासाठी वेगळे स्वरुप देऊन कालसुसंगत राहण्याच्या दृष्टीनेही कोल्हापूरच्या उद्योगांचा विचार करण्याची आवश्यकता असल्याचे डॉ. धांडे यांनी यावेळी सांगितले.
अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के म्हणाले, पारंपरिक शिक्षणाची व्यावसायिक शिक्षणाबरोबर सांगड घालून काम करण्याची गरज आहे आणि त्याला शासनाचे आवश्यक पाठबळ लाभणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी आता स्टार्टअपच्या माध्यमातून उद्योगाकडे वळण्यास सुरवात केली आहे, हे एक चांगले लक्षण आहे. भिंतीच्या आतील शिक्षणाचे बाहेरील जगातील उपयोजन करण्याची आज मोठी गरज आहे. त्या दृष्टीने यशाच्या विविध पायवाटा चोखाळण्याची दिशा या परिषदेमधून विद्यार्थ्यांना निश्चितपणे मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विद्यार्थीभिमुख आणि समाजाभिमुख अशा शिक्षकांच्या स्टार्टअपनाही पाठबळ देण्याची शिवाजी विद्यापीठाची भूमिका असल्याचेही त्यांनी सांगितले.
सुरवातीला रोपास पाणी घालून परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. इनोव्हेशन, इनक्युबेशन अँड लिंकेजेस केंद्राचे संचालक डॉ. सागर डेळेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. रसिया पडळकर यांनी सूत्रसंचालन केले, तर कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी आभार मानले.
परिषदेत दिवसभरात साऊंड कास्टिंग प्रा.लि., कोल्हापूरचे सरव्यवस्थापक आनंद देशपांडे यांचे ‘उत्पादन क्षेत्रातील नवप्रवाह आणि संधी’, टीसीएसच्या अॅकॅडेमिक अलायन्स ग्रुपचे प्रादेशिक प्रमुख हृषिकेश धांडे यांचे ‘व्यावसायिक जीवनासाठीची तयारी’, पुण्याच्या माने रुप ऑफ कंपनीजचे चेअरमन रामदास माने यांचे ‘असा घडतो उद्योजक’, हैदराबादच्या टी-हब कंपनीचे डॉ. राजेशकुमार अडला यांचे ‘उत्पादन नेतृत्व: उद्योवृद्धीचा मार्ग’ आणि हुबळीच्या देशपांडे स्कील डेव्हलपमेंट सेंटरचे नरसिंह नायक पेरमपल्ली यांचे ‘भावी पिढीसाठी पायाभरणी’ या विषयांवर व्याख्यान झाले. सायंकाळी राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात परिषदेत सहभागींसाठी विशेष सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
परिषदेत उद्या…
या परिषदेत उद्या (दि. १५) बारामतीच्या डॉ. संतोष करंजे यांचे ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित कृषी’, अमेरिकेतील गोरे समूहाच्या विनया गोरे यांचे ‘अमेरिकी परिप्रेक्ष्यात उद्योजकता’, आणंदच्या सरदार पटेल विद्यापीठाच्या डॉ. सौरभ सोनी यांचे ‘ऊर्जा निर्मिती आणि साठवणूक तंत्रज्ञान’ या विषयांवर व्याख्याने होतील. त्याचप्रमाणे विकसित भारतासाठी इनोव्हेशन व स्टार्टअप या विषयावर तज्ज्ञ आणि महिला उद्योजकांचे दोन महत्त्वाचे परिसंवाद होतील. हे सारे कार्यक्रम सकाळी १० वाजल्यापासून मानव्यशास्त्र सभागृहात होतील.