खुपिरेत सव्वा लाख किंमतीच्या बोगस खतांचा साठा जप्त; दुकानदारावर गुन्हा दाखल

कोल्हापूर (पांडुरंग फिरींगे)
करवीर तालुक्यात खुपिरे येथे बोगस रासायनिक खतांचा साठा आढळून आल्याने कृषी क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या शेतीसेवा दुकानात १०:२६:२६ (एनपीके ) या रासायनिक खताच्या ७७ बोगस खताच्या बॅगा आढळून आल्या आहेत. कृषी दुकानदार आकाश गणपती नाळे (रा.सांगरूळ) याच्यावर करवीर पोलिसांत अत्यावश्यक सेवा कायदा, खते नियंत्रण कायदा व रासायनिक खते कायदा असे तीन गुन्हे दाखल झाले आहेत.

 

 

याबाबत मिळालेली माहिती अशी, खुपिरे येथे कोल्हापूर गगनबावडा मार्गावर सांगरूळ मधील आकाश गणपती नाळे यांचे रंकभैरव नावाने शेती सेवा केंद्र आहे. या परिसरात खत तपासणी मोहीम सुरू असताना अचानक कृषी विभागाचे अधिकारी रंकभैरव शेती सेवा केंद्रामध्ये आले. यावेळी खताच्या बॅगांची तपासणी करत असताना पॅरादीप फॉस्फेट या खताच्या बॅगमध्ये १०:२६:२६ चे दुसरे खत भरले असल्याचा संशय आला. तसेच बॅगांवर प्रिंटिंग मिस्टेक असल्याचे लक्षात आले. १०:२६:२६ या खताच्या बॅगचा दर १७२० रुपये आहे. मात्र, या बोगस बॅगांवर एमआरपी १६५० रुपये होती. यामुळे अधिकाऱ्यांची शंका बळावली. यावेळी दुकानदाराला जाब विचारला असता ८० बॅग आल्या होत्या.

यातील तीन बॅग विकल्या असून ७७ बॅग स्टॉक मध्ये असल्याचे दुकानदाराने सांगितले. तातडीने कृषी अधिकाऱ्यांनी बॅगांची विक्री बंद करण्याचे आदेश देऊन खताचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले. सुमारे सव्वा लाख किंमतीच्या ७७ बॅगा ताब्यात घेतल्या. त्यानंतर कृषी अधिकाऱ्यांनी दुकानदाराच्या विरोधात करवीर पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. करवीर पोलीस उपनिरीक्षक नाथा गळवे यांनी घटनास्थळी भेट देऊन बोगस खतांच्या बॅगांचा पंचनामा केला. यानंतर करवीर पोलिसांत दुकानदारावर अत्यावश्यक सेवा कायदा, खते नियंत्रण कायदा, रासायनिक खते अशा कलमाखाली गुन्हा दाखल झाला आहे.

खरंतर बोगस खते तयार करणारा आरोपी मोकाट असून खते विक्री करणारा दुकानदार बळीचा बकरा बनला आहे. या शेती सेवा केंद्राला अशा बोगस खतांचा पुरवठा कोणी केला, बोगस खतांचा साठा अजून कुठे कुठे आहे? याची पाळेमुळे शोधणे गरजेचे आहे. जिल्हयात रब्बी, उन्हाळी आणि उसाच्या भरणीचा हंगाम सुरु असताना अशाप्रकारे बोगस खतांचा सुळसुळाट सुरू आहे. यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. या प्रकाराला आळा कधी बसणार? अशा संतप्त भावना शेतकऱ्यांतून उमटत आहेत.