अहिल्यादेवी होळकर सत्त्वशील राजकारणी: विनया खडपेकर

कोल्हापूर: अहिल्यादेवी होळकर यांनी सत्त्वशील राजकारणी म्हणून होळकरशाहीचे नाव उंचावले, असे गौरवोद्गार ज्येष्ठ लेखिका विनया खडपेकर यांनी काढले.

 

 

 

 

शिवाजी विद्यापीठाच्या अहिल्यादेवी होळकर अध्यासनातर्फे त्यांच्या त्रिशताब्दी जयंती महोत्सव वर्षानिमित्त ‘शोध होळकरशाहीचा’ या विषयावर आज एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले. त्यावेळी बीजभाषक म्हणून त्या बोलत होत्या. इतिहास अधिविभाग सभागृहात झालेल्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते.

विनया खडपेकर म्हणाल्या, अहिल्यादेवी यांनी होळकरशाहीचा कारभार राणी म्हणून नव्हे, तर विश्वस्त म्हणून सांभाळला. धार्मिक आणि सत्त्वशील राजकारणी म्हणून त्यांनी सर्वदूर लौकिक प्राप्त केला. त्याचप्रमाणे आर्थिक व्यवहारांच्या बाबतीतही त्या अत्यंत काटेकोर आणि चोख होत्या. त्या काळी पतीमाघारी वारसाअभावी राजकारभार चालविण्यासाठी दत्तकविधान करून त्याच्या नावे कारभार चालविण्याची प्रथा होती. तथापि, मुलाच्या मृत्यूनंतर अहिल्यादेवींनी माधवराव पेशव्यांकडे थेट कारभाराच्या अधिकाराची मागणी केली. त्यामुळे माधवरावांनी अहिल्यादेवींकडे मुलकी तर तुकोजी होळकरांकडे फौजी अधिकार सुपूर्द केले. हे अहिल्यादेवींच्या राजकारणाचे फलित होते. त्याचप्रमाणे युद्धासाठी नाना फडणवीस आणि महादजी शिंदे यांनी पैशांची मागणी केली असता ती स्पष्टपणे नाकारून युद्धासाठीचा पैसा हा तुमचा तुम्हीच मिळवावा, असे बाणेदारपणे सांगण्यातून आर्थिक व्यवहार सजगता दिसून येते. अहिल्यादेवींचा कालखंड हा होळकरशाहीचा लौकिक वृद्धिंगत करणारा ठरला, असेही त्या म्हणाल्या.

पूर्वी इतिहासलेखन हे केवळ युद्धांविषयीचेच होते आणि अहिल्यादेवी या युद्धात नव्हत्या. त्याचप्रमाणे स्त्रियांच्या कर्तृत्वाबद्दलही लिहीण्याचा इतिहास नव्हता. त्यामुळे अहिल्यादेवींविषयी इतिहासात खूपच त्रोटक माहिती उपलब्ध आहे. त्यांच्याविषयी माहिती गोळा करण्यासाठी अस्सल साधनांचा खूप शोध घ्यावा लागल्याचेही त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के म्हणाले, नेतृत्वविकास गुण आणि त्यांच्या जीवनकार्यातील विविध अलक्षित पैलू यांच्या अनुषंगाने अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्राचा संशोधकांनी अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. अहिल्यादेवी यांच्याविषयी जर काही संदर्भसाहित्य स्वामित्वहक्काबाहेर असतील, तर असे साहित्य संशोधकांच्या व्यापक उपयोगासाठी अध्यासनाने या त्रिशताब्दी जयंती वर्षात हाती घ्यावा. विनया खडपेकर यांच्या भाषणाची पुस्तिका तयार करावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

कार्यक्रमात मंचावर डॉ. विनिता तेलंग, डॉ. देवीदास पोटे होते. अध्यासनाचे समन्वयक डॉ. मच्छिंद्र गोफणे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. दत्तात्रय घोटुगडे यांनी आभार मानले. यावेळी डॉ. अवनीश पाटील, डॉ. गोविंद कोळेकर, डॉ. नीलांबरी जगताप, डॉ. दत्तात्रय मचाले यांच्यासह मराठी, हिंदी, इतिहास, अर्थशास्त्र इत्यादी विषयांचे शिक्षक, संशोधक, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

विशेष प्रदर्शनाचे आयोजन

या कार्यशाळेच्या निमित्ताने अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणाऱ्या विशेष प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अहिल्यादेवींच्या जीवनकार्याविषयीची चित्रे, माहितीफलक, नाणी, शस्त्रे, वस्तू, दुर्मिळ पुस्तके, स्मरणिका आदींचा समावेश होता. या प्रदर्शनाची कुलगुरू डॉ. शिर्के यांनी पाहणी केली आणि आयोजकांकडून त्याविषयी माहिती घेतली.