डॉ. अनिल गोरे आणि सहकाऱ्यांच्या संशोधनाने उघडकीस आणली भारतामधील तांदळातील सूक्ष्मप्लास्टिक प्रदूषणाची गंभीरता

कोल्हापूर : भारतामध्ये तांदळाच्या विविध नमुन्यांमध्ये सूक्ष्मप्लास्टिक कणांचा शोध लावणारे महत्त्वपूर्ण संशोधन प्रा. डॉ. अनिल ह. गोरे, प्रा. गोविंद भ. कोळेकर, कुमारी पिनल भावसार (PhDसंशोधक विद्यार्थिनी), आणि त्यांच्या सहकार्यांनी साकारले आहे. प्रा. डॉ. अनिल ह. गोरे हे शिवाजी विद्यापीठाचे माजी विद्यार्थी असून, मुळचे माळशिरस तालुक्यातील सदाशिवनगर गावचे रहिवासी आहेत.

 

 

सध्या ते उका तरसादिया विद्यापीठ, तरसादिया इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल सायन्सेस (TICS), सुरत येथे सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आपले शैक्षणिक जीवन आपल्या गावातून सुरू केले असून, दक्षिण कोरियातील प्रतिष्ठित संस्थेत त्यांनी पोस्टडॉक्टरल संशोधन पूर्ण केले आहे.

त्यांच्या संशोधन कारकिर्दीत त्यांना भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाकडून तरुण वैज्ञानिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सदरच्या संशोधनामध्ये भारतभरातील विविध तांदळाच्या नमुन्यांचे सूक्ष्मप्लास्टिक प्रदूषणासाठी विश्लेषण करण्यात आले. या अभ्यासात १०० ग्रॅम तांदळामध्ये सरासरी ३०.८ ± ८.६१ कण सूक्ष्मप्लास्टिक आढळले. हे कण मुख्यतः पारदर्शक फायबर स्वरूपाचे असून, १००-२०० मायक्रोमीटर इतक्या आकाराचे होते. संशोधनाने असे दाखवून दिले की, पॉलीएथिलीन (PE) आणि पॉलीएथिलीन टेरेफ्थेलेट (PET) या प्रकारचे सूक्ष्मप्लास्टिक कण तांदळामध्ये प्रमुख प्रमाणात आढळतात.

हे संशोधन जर्नल ऑफ ह्याझार्डस मटेरिअल्स (Journal of Hazardous Materials) या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. या अभ्यासाद्वारे तांदळातील सूक्ष्मप्लास्टिक प्रदूषणाच्या ओळखीचा आणि मानवी आरोग्यावर होणाऱ्या संभाव्य परिणामांचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे. डॉ. गोरे यांनी नमूद केले की, सूक्ष्मप्लास्टिक हे अत्यंत घातक दूषित घटक आहेत, जे मानव आणि पर्यावरणासाठी गंभीर धोका निर्माण करतात.

संशोधनात आढळले की, बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या तांदळाच्या विविध ब्रॅण्ड्समध्ये सूक्ष्मप्लास्टिक कणांचे प्रमाण आढळते, ज्यामुळे दीर्घकालीन आरोग्य समस्या जसे की कर्करोग, श्वसन विकार, आणि पचनाशी संबंधित विकार उद्भवण्याचा धोका आहे. विशेषतः महिलांचे
सूक्ष्मप्लास्टिक सेवन पुरुष आणि मुलांपेक्षा जास्त असल्याचे दिसून आले, ज्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.
डॉ. गोरे यांनी सूक्ष्मप्लास्टिक कमी करण्यासाठी काही उपाय सुचवले आहेत. त्यांनी शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना तांदळाच्या लागवडीसाठी आणि साठवणुकीसाठी शाश्वत आणि पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे.

तसेच, दररोजच्या वापरामध्ये तांदूळ व्यवस्थित पाण्याने किंवा मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुण्याने त्यातील सूक्ष्मप्लास्टिक कणांचे प्रमाण
कमी होऊ शकते, असे ते म्हणाले. या संशोधनामध्ये कुमारी पिनल भावसार (PhD विद्यार्थी), प्रा. यासुहितो शिमाडा (मिई युनिव्हर्सिटी जपान), प्रा. गोविंद कोळेकर (शिवाजी विद्यापीठ, कोल्हापू), प्रा. शशिकांत पटोले (खलीफा विद्यापीठ, यूएई), डॉ. सुमित कांबळे (CSMCRI, भावनगर), आणि मंदीप सोलंकी यांचे मोलाचे सहकार्य आणि योगदान लाभले आहे. सूक्ष्मप्लास्टिक प्रदूषणाच्या ओळखीत भारताला महत्त्वपूर्ण यश मिळवून देणाऱ्या या संशोधनामुळे तांदूळ उत्पादन व आरोग्यासाठी सुरक्षिततेचे नवीन मार्ग उघडले गेले आहेत.
पर्यावरणपूरक उपाययोजना आणि शाश्वत जीवनशैली अंगीकारल्यास हा धोका कमी करता येऊ शकतो, असे डॉ. अनिल गोरे यांनी सांगितले.