उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘दृष्टी’ स्मरणिकीचे प्रकाशन

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका संचालित राजे एडवर्ड स्मारक (के.ई.एम.) रुग्णालय आणि सेठ गोर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालयाच्या शताब्दी वर्षानिमित्त शिवसेना मुख्यनेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते वार्षिक अहवाल-२०२४ आणि दैनंदिनी-२०२५ तसेच ‘दृष्टी’ या स्मरणिकीचे प्रकाशन आज करण्यात आले.

 

 

 

रुग्णसेवेचे व्रत अविरतपणे घेतलेलं केईएम रुग्णालय हे मुंबईकरांचे खऱ्या अर्थाने आधारवड आहे. ज्या विश्वासाने रुग्ण येथे येतात, त्यांना जागा कमी पडू नये यासाठी केईएम रुग्णालयात आयुष्मान शताब्दी टॉवर उभे करावे, रुग्णालयात झिरो प्रिस्किप्शन पॉलिसी लागू करावी, रुग्णाच्या नातेवाईकांची परवड होवू नये यासाठी व्यवस्था निर्माण करावी तसेच डॉक्टरांच्या अखंड रुग्णसेवेचे म्युझियम तयार करण्यात यावे अशा सूचना उपमुख्यमंत्रीएकनाथजी शिंदे यांनी केल्या.

केईएम रुग्णालयाचा देशभर लौकिक आहे कारण, भारतातील पहिली हृदय शस्त्रक्रिया केईएम रुग्णालयात १९६८ मध्ये झाली. त्यानंतर २०२४ रोजी यशस्वी हार्ट ट्रान्सप्लाण्ट येथे करण्यात आले. अवयवदानामध्ये वाखाणण्यासारखे कार्य केल्याबद्दल केईएम रुग्णालयाचा काही दिवसांपूर्वीच दिल्लीत गौरव करण्यात आला. भारतातील पहिली टेस्ट ट्युब बेबीही केईएम रुग्णालयात १९८७ साली डॉ.इंदिरा हिंदुजा यांनी घडवली आणि आता इथे रोबोट या अत्याधुनिक तंत्रज्ञानामार्फत गुडघ्याच्या सांध्यांवर शस्त्रक्रिया करण्यात येतात. वैद्यकीय क्षेत्रात केईएम रुग्णालयाने केलेली ही क्रांती ऐतिहासिक असल्याचे मत यावेळी व्यक्त केले.

केईएम रुग्णालयाने घेतलेलं रुग्णसेवेचं व्रत अवघड आहे. आजही इथली रुग्णसेवा अहोरात्र चालू आहे. इथल्या डॉक्टरांचे, परिचारिकांचे आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानावे तेवढे कमी आहेत. तुम्ही आहात, म्हणून सामान्य मुंबईकर आज विश्वासाने जगत असल्याचे मत याप्रसंगी व्यक्त केले. तसेच यानिमित्ताने खास स्मरणिकेचे प्रकाशन करून काही डॉक्टर, नर्सेस आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सन्मानित केले.

यावेळी आमदार कालिदास कोळंबकर, आमदार सुनील शिंदे, मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त बिपिन शर्मा, केईएमच्या अधिष्ठाता डॉ.संगीता रावत आणि केईएम रुग्णालयातील कर्मचारी, रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.