कोल्हापूर – शाळकरी मुलाला पळवून नेऊन जबरदस्तीने पैसे वसूल करणाऱ्या खासगी सावकारांवर कारवाई करा, या मागणीसाठी आकुर्डे (ता. पन्हाळा) येथील सरदार पाटील यांनी कुटुंबीयांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. शुक्रवारी उपोषणाचा तिसरा दिवस होता.
सरदार पाटील यांचे पुतणे विठ्ठल पाटील यांनी कळे येथील अशोक राजाराम पाटील यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दिली होती. त्यावर अशोक पाटील यांनी विठ्ठल पाटील यांना रक्कम परत केली आणि तक्रार मागे घ्यायला लावली. मात्र त्यानंतर प्रदीप भोसले, प्रल्हाद भोसले यांनी पैशासाठी तगादा लावला. विठ्ठल पाटील यांचा मुलगा पीयूष याला जबरदस्तीने आपल्या घरी नेऊन पैशाची मागणी केली. अशोक पाटील
याला आम्ही पैसे पुरवत असल्याचे सांगत या दोघांनी विठ्ठल पाटील यांच्याकडून पैसे उकळले आहेत. याबाबत पोलिसांत तक्रार करूनही याबाबत कोणतीही कारवाई झालेली नाही, असे जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
संबंधित व्यक्तींवर कारवाई व्हावी, जबरदस्तीने काढून घेतलेले पैसे परत मिळावे, या मागणीसाठी आता सरदार पाटील, विठ्ठल पाटील हे कुटुंबीयांसह उपोषणाला बसले आहेत. संबंधित सावकारांनी पुतण्याला लुबाडले आहे, घरातील महिलांचे सोने गहाण ठेवून सावकाराचे पैसे दिले, इतका त्रास दिला आहे. संबंधितांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, असा इशारा यावेळी पाटील कुटुंबाने दिला.