कोल्हापूर – हिंदु राष्ट्राची स्थापना, मंदिरांवरील, तसेच मंदिराच्या भूमीवरील अतिक्रमणे तात्काळ हटवण्यात यावी, तसेच हिंदूंचे व्यापक संघटन-धर्मशिक्षण यांसाठी दर आठवड्याला ‘मंदिर तेथे सामूहिक आरती’ करण्याचा निर्णय नुकताच शिर्डी येथे ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’त एक हजारांहून अधिक मंदिरांच्या विश्वस्तांनी घेतला होता.
त्याप्रमाणे या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवार, 3 जानेवारीला श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात रात्री 8 वाजता याचा प्रारंभ करण्यात येत आहे. श्री महालक्ष्मीदेवीच्या मंदिरातील रात्रीची आरती जेव्हा होते त्याच वेळेत ही आरती होत आहे. या आरतीसाठी सनातन संस्थेच्या धर्मप्रसारक सद्गुरु स्वाती खाडये या उपस्थित रहाणार आहेत. या आरतीद्वारे हिंदु धर्माच्या पवित्र परंपरा, धार्मिक जागृती, तसेच सांस्कृतिक एकात्मता दृढ करण्याचा संकल्प आहे. तरी सर्व हिंदू बांधवांनी या आरतीसाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन मंदिर महासंघाचे संयोजक श्री. प्रमोद सावंत, सहसंयोजक श्री. अभिजित पाटील आणि समन्वयक श्री. प्रसाद कुलकर्णी यांनी केले आहे.
या महाआरतीचा उद्देश हिंदु धर्मावर होणार्या आघातांना तोंड देणे, मंदिरांच्या पवित्रतेचे रक्षण करणे, हिंदू समाजात एकता आणि जागरूकता निर्माण करणे हे आहे. तरी अशा प्रकारे आरती प्रत्येक मंदिरात चालू व्हाव्यात, त्या समाजाने/भाविकांनी पुढाकार घेऊन कराव्यात. अशी आरती चालू करण्यासाठी कुणाला साहाय्य हवे असल्यास त्यांनी मंदिर महासंघाशी संपर्क साधावा, असे आवाहन मंदिर महासंघाच्या वतीने करण्यात येत आहे.